रोममधील येशूच्या मूर्तीवर वैष्णव टिळा !  

शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा दावा

शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती

कवर्धा (छत्तीसगड) – मी ख्रिस्त्यांना विचारतो की, ते येशू यांच्याविषयी किती माहिती ठेवतात ? रोममध्ये येशूच्या मूर्तीवर वैष्णव लावतात, तसा टिळा आहे. आजही ही मूर्ती तेथे आच्छादन घालून ठेवण्यात आली आहे आणि ते आच्छादन काढण्यात आलेले नाही, असा दावा पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी त्यांच्या मार्गदर्शनात केला. ते असेही म्हणाले की, येशूच्या नावावर ख्रिस्ती बनत असलेल्या लोकांना येशूचा इतिहासच ठाऊक नाही. येशू काही वर्षे कुठे होते, हेही त्यांना ठाऊक नाही. येशू ३ वर्षे भारतात राहिले होते, असाही दावा शंकराचार्यांनी केला.

शंकराचार्य यांनी पुढे सांगितले की, तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन माझ्याकडे आले होते. त्यांनी मला येशूविषयीचा इतिहास सांगितला. त्यांनी सांगितले की, जेव्हा येशू यांना सुळावर चढवण्यात आले, तेव्हा लोकांना वाटले येशू आता जिवंत राहू शकत नाहीत; मात्र ते जिवंत राहिले आणि नंतर ते भारतात पोचले. ते जम्मू-काश्मीरमध्ये राहिले. तेथे त्यांची समाधी आहे. या इतिहासाविषयी तुम्ही काय सांगणार आहात ? बायबलमधून गीतेतील काही गोष्टी काढून टाकल्या, तर त्यात काय शिल्लक रहाणार आहे ? बायबलनुसार सृष्टी ६ सहस्र वर्षे जुनी आहे, तर गीतेच्या अनुसार ती २ कोटी वर्षे प्राचीन आहे.

सनातन धर्मात जन्मापासूनच आरक्षण अस्तित्वात !

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी आरक्षणाविषयी सांगितले की, सनातन धर्मामध्ये आरक्षणाला पूर्ण स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीचे जन्मापूर्वीपासून पालनपोषणाचे आरक्षण करण्यात आलेले असते. याहून योग्य आरक्षण काय असू शकते ? अयोग्य व्यक्ती जर एखाद्या महत्त्वाच्या पदावर पोचली, तर देशाचा उत्कर्ष होऊ शकेल का ? सर्वांना योग्य बनवले पाहिजे; मात्र आरक्षणाच्या नावाखाली अयोग्य व्यक्ती जर महत्त्वाच्या ठिकाणी पोचला, तर देशाची हानीच होणार नाही का ? आरक्षणामुळे प्रतिभेची हानी, प्रगतीची हानी, तसेच सूडाची भावना निर्माण होईल. आरक्षणामुळे देश पारतंत्र्यात जाईल.

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्ववरानंद सरस्वती यांना शंकराचार्य मानण्यास दिला नकार !

रणवीरपूर येथे पत्रकारांशी बोलतांना शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना शंकराचार्य मानण्यास नकार दिला. ते म्हणाले की, त्यांच्या (अविमुक्तेश्वरानंद यांचे) गुरुजींचा देहत्याग ९९ वर्षांचे असतांना झाला; मात्र तत्पूर्वी त्यांनी त्यांची गादी कुणालाही दिली नाही. आता प्रश्न उपस्थित होतो की, कुणी शंकराचार्य बनून फिरत असतील आणि कदाचित ते खरेही असतील, तरी मर्यादांचे अतिक्रमण करत असल्यास आमच्या दृष्टीने ते शंकराचार्य असतांनाही ते मानण्यास योग्य असणार नाहीत.

अमरकंटक (मध्यप्रदेश) येथे ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना पत्रकारांनी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या विधानाविषयी विचाले असता ते म्हणाले की, जरी आमच्या गुरूंनी माझी नियुक्ती केली नसली, तरी त्यांच्या सर्व शिष्यांनी मला शंकराचार्यांच्या रूपात स्वीकारले आहे. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी मर्यादा सांगाव्यात की, ज्यांचे मी उल्लंघन केले आहे. कोणत्याही शंकराचार्यांचे मर्यादाबाह्य आचरण ते आणि मी दोघेही कदापी सहन करणार नाही.