अखिल भारतीय मराठी संमेलनाचे उद़्घाटन !
वर्धा, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – मराठी साहित्यकांनी मराठी माणसांचे मन समृद्ध केले. या सर्व प्रतिभावंतांचे मराठी माणसांवरील ऋण न फिटणारे आहे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मातीचा गंध साहित्यिकांच्या लेखनातून दरवळत असतो. साहित्याचा हा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे. मराठी भाषेचा विकास आणि संशोधन यांसाठी शासकीय प्रयत्न चालू आहेत. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद़्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/jKKnP3lN2q
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 3, 2023
मराठी साहित्य संमेलनाचे उद़्घाटन संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवर यांच्या शुभहस्ते झाडाला जलार्पण करून अन् दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रारंभी सामूहिक वर्धा गौरव गीतगायन करण्यात आले. त्यानंतर पडद्यावर संमेलन गीत झाले आणि संमेलनाला प्रारंभ झाला. या वेळी व्यासपिठावर संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, आमदार पंकज भोयर, आमदार भोंडेकर, स्वागताध्यक्ष दत्ताजी मेघे, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष भारत सासने आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘हे साहित्यिकांचे राज्य आहे. गांधीजी, आचार्य विनोबा भावे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण, म. फुले, डॉ. आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे असे कितीतरी थोर राजकीय नेतेेही साहित्यिकच होते. त्यांनी साहित्यातून समाजसेवा केली. साहित्यिक हे लोकांचे दु:ख समजून घेतात. सामाजिक चळवळीतून राजकीय नेतृत्व उदयास येत असते. त्यामुळे सामाजिक चळवळ ही राजकीय नेते आणि साहित्यिक यांचे उगमस्थान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.’’
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा देण्याचे निवेदन मान्य केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
संपादकीय भूमिकाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठीचा उत्कर्ष साधला जावा, ही मराठीप्रेमींची अपेक्षा ! |