(म्हणे) ‘वर्ष २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाणार होते !’

पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार जावेद चौधरी यांचा दावा !

इस्लामाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२१ मध्ये पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार होते आणि तेथे ते पुन्हा भारत-पाक मैत्रीची घोषणा करणार होते, असा दावा पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार जावेद चौधरी यांनी एका लेखामध्ये केला आहे. या दावा किती खरा आहे, याचा अद्याप पाकच्या राजकीय स्तरावर कुणीही दुजोरा दिलेला नाही.


पाकिस्तानी पत्रकार जावेद चौधरी यांनी म्हटले आहे की, पाक सैन्याने वर्ष २०२० मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान येण्यासाठी सिद्ध केले होते. जनरल फैज हमीद यांनी हे शक्य केले होते. त्यांनी एका अरब देशात भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. त्यांच्यातील चर्चेनंतर ‘पंतप्रधान मोदी ९ एप्रिल २०२१ मध्ये पाकिस्तानात येतील’, असे ठरवण्यात आले होते. पंतप्रधान मोदी पाकमधील श्री हिंगलाजमातेचे भक्त आहेत. ते पाकमध्ये आल्यावर थेट श्री हिंगलाजमाता मंदिरात जातील आणि तेथे १० दिवस व्रत ठेवतील. पाकमधून परत जातांना ते तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतील, दोघे एकमेकांचा हात पकडून मैत्रीची घोषणा करतील. मोदी तेव्हा, ‘आम्ही पाकसमवेत व्यापार चालू करू. भारत-पाक दोन्ही देशांच्या प्रश्‍नात हस्तक्षेप करणार नाहीत आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होणार नाहीत, काश्मीरवर एकत्र बसून निर्णय घेऊ’, असे घोषित करतील. या सर्व गोष्टी ठरल्या होत्या.

पाकिस्तानचे पत्रकार जावेद चौधरी

मात्र त्या वेळी पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी इम्रान खान यांना, ‘असे केल्यास तुमच्यावर काश्मीरचा सौदा केल्याचा आरोप होईल’, अशी भीती दाखवली. त्यामुळे इम्रान खान मोदी यांच्या भेटीच्या प्रकरणातून माघार घेतली त्यामुळे हा दौरा होऊ शकला नाही.

संपादकीय भूमिका

भारत सरकारने वारंवार पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर आणला आहे. त्यामुळे ‘पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का ?’, असा संशय भारतियांना आल्यास आश्‍चर्य ते काय ? भारत सरकारने हे लक्षात घेऊन याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !