ऑस्ट्रेलियातील गुरुद्वाराच्या बाहेर खलिस्तानच्या मागणीसाठी सार्वमत घेण्याविषयी भित्तीपत्रके चिकटवली !

ऑस्ट्रेलिया सरकारकडून दुर्लक्ष !

खलिस्तानच्या मागणीसाठी सार्वमत घेण्याविषयी लावलेली भित्तीपत्रके

मेलबर्न – व्हिक्टोरिया येथील प्लमटन गुरुद्वाराच्या बाहेर स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी सार्वमत घेण्याविषयी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. या भित्तीपत्रकांवर भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मारेकरी बेयंत सिंह आणि सतवंत सिंह यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. त्यांना ‘हुतात्मा’ असे संबोधण्यात आले आहे. या भित्तीपत्रकांवर ‘शेवटी लढाई ! खलिस्तानसाठी सार्वमत : मतदान २९ जानेवारी: मेलबर्न’ असे छापण्यात आले आहे. (स्वतंत्र खलिस्तानसाठी ऑस्ट्रेलियात सार्वमत घेऊन तेथे भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचा खलिस्तानवाद्यांचा डाव आहे, हे जाणा !  – संपादक)

१. खलिस्तानच्या मागणीसाठी सार्वमत घेण्याविषयी मागील वर्षी ऑस्ट्रेलियातील काही शहरांमध्ये मोर्चे काढण्यात आले होते. खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टीस’ने हे सार्वमत घेण्याचे आयोजन केले आहे.

२. ‘भारत सरकारने यापूर्वीही ऑस्ट्रेलिया सरकारला तेथील वाढत्या खलिस्तानी कारवायांविषयी सतर्क केले होते. ऑस्ट्रेलिया सरकारने ते मनावर घेतले असते, तर अशी भित्तीपत्रके लागली नसती’, अशी टीका भारतियांनी केली आहे.

खलिस्तानी कारवायांचा अड्डे बनलेला प्लमटन गुरुद्वारा !

प्लमटन गुरुद्वारामध्ये यापूर्वीही खलिस्तानीवाद्यांनी अनेक वेळा बैठका आयोजित केल्या आहेत. या गुरुद्वाराच्या परिसरात अनेक जण खलिस्तानी झेंडे घेऊन मिरवतांना दिसले आहेत. खलिस्तानी विचारसरणीचा अभिनेता दीप सिद्धू याचे निधन झाल्यानंतर त्याला श्रद्धांजली वहाण्यासाठी या गुरुद्वारात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

  • खलिस्तानी आतंकवाद कॅनडा, अमेरिका आदी देशांत फोफाववला असतांना भारत सरकारने तो नष्ट करण्यासाठी काहीही पावले न उचलल्यामुळे तो आज जगात फोफावत आहे. खलिस्तानी आतंकवादाने आक्राळविक्राळ रूप धारण करण्याआधी भारत सरकारने तो नष्ट करण्यासाठी पावले उचलावीत !