पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे सहस्रो हिंदूंचा विराट ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’

पिंपरी-चिंचवड – राज्यासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा, तसेच गोवंश हत्याबंदी कायदा व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे १८ डिसेंबर या दिवशी विराट ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये २० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, तसेच सहस्रो हिंदु नागरिक उपस्थित होते. मोर्च्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. येथील महावीर चौकातून निघालेला मोर्च्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सभेमध्ये रूपांतर होऊन शेवट झाला. सभेमध्ये स्वरूपा भोईने, सौरभ करडे, सचिन ढोबळे आणि श्री. नाणेकर यांनी उद्बोधन केले.

पिंपरी-चिंचवड येथे निघालेला विराट‘हिंदू जनगर्जना मोर्चा’

प्रेम करतांना डोळसपणा ठेवा ! – स्वरूपा भोईने

हिंदु भगिनींनो, प्रेम करतांना डोळसपणा ठेवा. धर्मांतर, लव्ह जिहाद यांना बळी पडू नका. आम्ही सरकारला आवाहन करतो की, लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या ही हिंदूंवर ओढवलेली संकटे मोडून काढा.

जो आमच्या देवाला घराबाहेर काढू इच्छितो, त्याला देशाबाहेर काढल्याविना स्वस्थ बसू नका ! – शिवव्याख्याते सौरभ कर्डे

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जवळजवळ वर्षभर गोतस्करी चालू आहे. भुलीचे इंजेक्शन देऊन गायींना पकडून नेण्यात येते. आपले बरेच गोरक्षक त्याविषयी पालिकेत जाऊन निषेध करतात. ख्रिस्ती मिशनर्‍यांपासून सावध रहा. प्रत्येक हिंदु नागरिक, तरुण, स्त्री यांचे दायित्व आहे की, आपल्या शेजारच्या ५ घरांवर लक्ष ठेवावे. ख्रिस्ती मिशनरी गोड बोलून पैशांचे, औषधांचे साहाय्य  करून त्यांना देव घराबाहेर काढायला का सांगत आहेत ? जो आमच्या घरातून आमचा देव बाहेर काढायला लावतो, त्याला देशाच्या बाहेर काढल्याविना स्वस्थ बसू नका.

(सौजन्य : Zee 24 Taas) 

क्षणचित्रे

१. ‘टिकलीवर श्रद्धा असती, तर श्रद्धा आज टिकली असती !, धर्म म्हणजे आस्था आणि आस्था कधी बदलत नाही’ असे लिखाण असलेले हस्तफलक मोर्च्यामध्ये लक्षवेधी ठरले.

२. भगवे ध्वज, तसेच ‘जय श्रीराम, जयतु हिंदुराष्ट्रम्’ अशा घोषणांनी ‘पिंपरी-चिंचवड परिसरातील वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले’, अशी भावना मोर्च्यात सहभागी हिंदूंची होती.