पाकिस्तानमधील वादग्रस्त मौलवी मियाँ अब्दुल हक याच्यावर ब्रिटीश सरकारने घातले निर्बंध !

अल्पवयीन हिंदु मुलींचे बळजोरीने धर्मांतर आणि विवाह केल्याचे प्रकरण

(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)

मियां मिठू या नावाने कुप्रसिद्ध असलेला वादग्रस्त मौलवी मियाँ अब्दुल हक (उजवीकडील)

लंडन – पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील वादग्रस्त मौलवी मियाँ अब्दुल हक याचा ब्रिटीश सरकारच्या निर्बंध सूचीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा केल्या जाणार्‍यांच्या ११ देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तानला समाविष्ट करण्यात आले आहे.

१. ‘डॉन’ला दिलेल्या एका मुलाखतीत ब्रिटीश उच्चायुक्तांनी म्हटले आहे, ‘आमचा देश धर्म किंवा श्रद्धा यांविषयीचे स्वातंत्र्य अतिशय गांभीर्याने घेतो. ब्रिटन जगभरातील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे.’

२. ब्रिटनने जगभरात व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणार्‍या लोकांची सूची प्रसारित केली आहे. यामध्ये सिंध येथील भरचुंडी शरीफ दर्ग्याचे मौलवी मियां अब्दुल हक याचा समावेश आहे. अल्पवयीन बिगर मुसलमान मुलींचे बळजोरीने धर्मांतर आणि विवाह केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

३. ब्रिटीश सरकार ज्या लोकांचा या सूचीत समावेश करते, त्यांना ब्रिटनचे नागरिक आणि आस्थापने यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार किंवा व्यापार करता येणार नाही. तसेच त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेश नाकारला जाईल.

४. मियां मिठू या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या या मौलवीने फेब्रुवारी २०१२मध्ये रिंकल कुमारी या हिंदु मुलीचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याने आणि नंतर तिचे फरयाल असे नामकरण करून तिचा नावीद शाह याच्याशी बळजोरीने विवाह लावून दिल्याने मौलवी मियां मिठू चर्चेत आला होता.

संपादकीय भूमिका

पाकमध्ये हिंदूंच्या मानवाधिकारांचे हनन करणार्‍यांच्या विरोधात ब्रिटन सरकार काही तरी पावले उचलते. भारत सरकार पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस पावले कधी उचलणार ?