धर्मांतर विरोधात कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून तहसीलदारांना निवेदन !

राहुरी (जिल्हा नगर) येथील फादरने शीख विद्यार्थ्याचे केस कापल्याचे प्रकरण

निषेधासाठी जमलेले शीख आणि हिंदु बांधव

कोपरगाव (नगर) – धर्मांतराच्या वाढणार्‍या घटनांविरोधात कोपरगावकर आक्रमक झाले आहेत. नुकत्याच राहुरीतील डे. पॉल इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांनी हरदिलसिंह सोदि या मुलाचे केस कापून धार्मिक चिन्हे मिटवण्याचा आणि शीख धर्मातून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात फादरला अटक झाली आहे. या प्रकरणात केवळ एकच आरोपी धर्मांतराच्या प्रक्रियेत सक्रिय नसून यामागे एक मोठी टोळी कार्यरत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून टोळीचा छडा लावावा, अशी मागणी येथील सकल हिंदु समाज आणि श्री गुरु सिंग सभा यांनी तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

धर्मांतर करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍या प्रशासनातील व्यक्तींचीही चौकशी करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी सकल हिंदु समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शीख बांधव, हिंदु जनजागृती समिती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे (अराजकीय)कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.