जगप्रसिद्ध ‘टेस्ला’ या आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ या सामाजिक माध्यमाचा बहुचर्चित खरेदी करार अखेर पूर्ण करून त्याचा ताबा घेतला. मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर म्हणजे तब्बल ३६ सहस्र २०६ कोटी ५८ लाख ८० सहस्र रुपयांना ट्विटर आस्थापन विकत घेतले आहे. जेव्हा मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी ४४ बिलियन डॉलर खर्च करण्याची घोषणा केली, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या; मात्र ट्विटरवरील बनावट (खोट्या) खात्यांचे सूत्र मस्क यांनी उपस्थित केले. या बनावट खात्यांची माहिती त्यांना आस्थापनाच्या संचालक मंडळाकडून दिली गेली नाही. त्यामुळे त्यांनी हा करार रहित करण्याची घोषणा केली. त्यांनी ऑक्टोबर मासात ही प्रक्रिया पुन्हा चालू करून ट्विटर खरेदी केलेच; पण त्यासमवेत ट्विटरच्या मुख्य अधिकार्यांपैकी तिघांची त्वरितच हकालपट्टी केली. यामध्ये २ जण भारतीय वंशाचे, तर १ अन्य आहे. या हकालपट्टीत पराग अग्रवाल, विजया गड्डे अशी भारतियांची नावे वाचून अन्य भारतियांना वाईट वाटू शकते; पण जी नावे भारतीय म्हणून आपण वाचत आहोत, ती मात्र प्रत्यक्षात भारतविरोधी साम्यवादी मानसिकतेच्या लोकांची आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे.
ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी जेव्हा काही वर्षांपूर्वी भारतात आले होते, तेव्हा त्यांनी येथील ‘पुरुषसत्ताक पद्धती ठेचून काढा !’, असा फलक हातात धरला होता. तेव्हा विजया गड्डे, बरखा दत्त इत्यादी साम्यवादी मानसिकतेच्या महिला त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या. ‘विदेशातील एका जगप्रसिद्ध आस्थापनाचा संस्थापक भारतात येतो आणि असे काही फलक झळकावतो’, हे सर्वसामान्य भारतियांना बुचकळ्यात टाकणारे होते. मानवजातीचे कल्याण करणार्या, कुटुंबव्यवस्था सांभाळणार्या भारतीय संस्कृतीविषयी एवढा द्वेष त्यांच्या मनात निश्चितपणे भारतात राहून येथील संस्कृतीचा तिरस्कार करणार्यांकडून भिनवला असणार, हे स्पष्ट होते. अन्यथा पाहुण्यांना येथील व्यवस्था काय कळणार ? येथील साम्यवादी लेखकांचे एकच काम असते, ते म्हणजे येथील संस्कृती आणि सभ्यता यांविषयी टीकात्मक लिखाण करून भारताची प्रतिमा विदेशात करता येईल तेवढी मलीन करायची ! याचे नुकतेच घडलेले उदाहरण म्हणजे ब्रिटनमधील प्रसिद्ध दैनिक ‘द गार्डियन’चे लेखक पंकज मिश्रा यांनी ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर टीका करतांना लिहिले, ‘ऋषी सुनक गोमांस आणि मद्य यांपासून दूर असणे, ही सवर्णांची विचारसरणी !’, ‘सुनक हे भारतातील राष्ट्रवादींसाठी ‘देशी ब्रो’ (भारतीय असलेले विदेशी भाऊ) आहेत.’ आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशी घातक विचारसरणी साम्यवाद्यांच्या सडक्या डोक्यात घर करून असते.
विजया गड्डे (साम्यवादी) पराजित
मस्क यांनी ट्विटरमधून काढलेल्या साम्यवाद्यांपैकी विजया गड्डे यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावर आजीवन बंदी घातली. (ट्रम्प हे तेव्हा मुक्त विचारसरणीचे आणि हिंदूंची विशेषत: भारताची पाठराखण करणारे होते.) त्या तथाकथित ब्राह्मणीसत्ताक पद्धतीच्या विरोधक होत्या आणि त्यांनी साम्यवाद्यांना खोट्या बातम्या प्रसारित होण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शेफाली वैद्य, ट्रू इंडॉलॉजी आणि अन्य अनेक हिंदुत्वनिष्ठ स्वत:च्या ट्विटर हँडलवरून राष्ट्र अन् धर्म हितैषी लिखाण ट्वीट करून प्रसारित करायचे; पण त्यांचे ट्वीट सहस्रो लोकांनी ‘रिट्वीट’ करूनही लोकांची संख्या मात्र शेकड्यांमध्ये रहायची. काही वेळा या ट्वीट्सना ‘लाईक’ (आवडले) करणार्यांची संख्या, रिट्वीट करणार्यांची संख्या अचानक अल्प व्हायची. ट्विटरवरील हिंदुत्वनिष्ठांचे ‘फॉलोअर्स’ (अनुयायी) संख्या विशिष्ट मर्यादेच्या पुढे वाढायची नाही, तर काही वेळा ही संख्या अल्पही व्हायची. काही हिंदुत्वनिष्ठांचे ट्विटर हँडल केवळ काही राष्ट्र आणि धर्म हितैषी लिखाणावर कुणी सोम्या-गोम्याने आक्षेप घेतल्यावरही ‘सस्पेंड’ (तात्पुरते अथवा कायमस्वरूपी बंद) केले जायचे. याउलट साम्यवादी आणि धर्मांध यांच्या खात्यांविषयीच्या तक्रारी हिंदुत्वनिष्ठांनी ‘ट्विटर इंडिया’ या ट्विटरच्या भारतातील हँडलकडे नोंदवल्या; मात्र त्याचा काहीच परिणाम गैरप्रकारांवर होत नव्हता. नंतर हे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत, हे हिंदुत्वनिष्ठ आणि ट्विटरवरील अन्य राष्ट्रप्रेमी यांनाही लक्षात आले. विजया गड्डे यांच्या व्हॉट्सॲप खात्याचा विविध साम्यवाद्यांकडे थेट संपर्क होता. साम्यवादी त्यांना वर उल्लेखलेले (गैर)प्रकार करण्यास सांगत आणि त्यानुसार त्या कृती करत, अशी जाणकारांची माहिती आहे. येथे विचार करण्याचे सूत्र म्हणजे प्रामाणिकपणे सामाजिक माध्यमांमध्ये व्यक्त होण्याचा भारतातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांचा मार्गच ट्विटरच्या पूर्वग्रहदूषित अधिकार्यांनी बंद पाडला होता. अन्य देशांतील राष्ट्रप्रेमींनाही याचा मोठा फटका बसला होता. प्रसारमाध्यमांनंतर एवढे मोठे सामाजिक व्यासपीठही साम्यवाद्यांच्या नियंत्रणातून सुटले नाही, हे येथे नमूद करावेसे वाटते. अशा या साम्यवादी अधिकार्यांनी एक प्रकारची गळचेपी, आवाज दाबण्याचा प्रकार भारतियांसमवेत केला आहे. त्यामुळे ट्विटरला या साम्यवादी आतंकवादातून मुक्त करणे आवश्यक होते.
हा विडा मस्क यांच्यासारख्या मुक्त विचारांचा पुरस्कार करणार्यांनी उचलला आणि तो पूर्णत्वासही नेला. ट्विटर खरेदी केल्यानंतर आणि तिघा अधिकार्यांची हकालपट्टी केल्यानंतर मस्क यांनी उगाच ट्वीट केले नाही, ‘चिमणी मुक्त झाली….चांगले दिवस येऊ देत !’ केवळ ट्विटरच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या सामाजिक माध्यमांवरील साम्यवादी कीड नष्ट होऊन राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना विचारस्वातंत्र्याचा अनुभव येणे आवश्यक आहे अन् ते लवकरच पूर्णत्वाला जाईल कि नाही, ते आगामी काळात कळेलच !
सामाजिक माध्यमांवरील साम्यवाद्यांचा पगडा नष्ट होण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी मोहीम उघडणे आवश्यक ! |