कोईम्बतूर येथील स्फोट हे आत्मघाती आक्रमण असल्याची शक्यता

आतापर्यंत ५ जणांना अटक

कोईम्बतूर (तमिळनाडू) – येथील कोट्टई ईश्‍वरम् मंदिराजवळ २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. हे आत्मघाती आक्रमण होते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटात वाहनातील जमेझ मुबीन ठार झाला होता. त्याचे इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून यापूर्वी त्यांची चौकशीही झाली होती. तसेच त्याचा संबंध श्रीलंकेत इस्टर संडेच्या सणाच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटांशी असल्याचेही म्हटले जात आहे.

१. अटक करण्यात आलेल्या ५ जणांना सीसीटीव्हीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. त्यांना स्फोटाच्या एक दिवस आधी घटनास्थळी माहिती गोळा करतांना पहाण्यात आले होते. यात ठार झालेला मुबीनही होता. या सर्वांकडे पिशव्या होत्या.

२. तमिळनाडूचे पोलीस महासंचालक सी. शैलेंद्र बाबू म्हणाले की, हा स्फोट न्यून तीव्रतेचा होता. यात पोटॅशियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता.

३. अण्णा द्रमुकचे (द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरचिटणीस आणि विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘या प्रकरणाच्या चौकशीवर कोणताही राजकीय दबाव टाकण्यात येऊ नये’, असेही त्यांनी म्हटले.

४. या घटनेला भाजपने ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटले आहे. गेल्या ३६ घंट्यात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कोणतेही विधान केलेले नाही, यावरही भाजपने टीका केली आहे.