नवी मुंबई – माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासह त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा आदी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील ए.पी.एम्.सी. मार्केट (भाज्यांचा घाऊक बाजार) येथे आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्या वेळी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह अन्य आमदार उपस्थित होते.
माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन कायमच प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे याप्रसंगी जाहीर केले. pic.twitter.com/UEoRIX9aFf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 25, 2022
माथाडी कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारने सोडवण्यासाठी कार्यवाही चालू केली आहे. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी मुंबै बँकेच्या सहाय्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिक संख्येने पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया चालू केली आहे. मराठा समाजात नवीन उद्योजक सिद्ध होण्यासाठी अनेक योजनांवर राज्यशासन काम करत आहे. युतीच्या काळात या महामंडळावर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे अध्यक्ष असतांना त्यांनी ३ वर्षांत ५० सहस्र तरुणांना व्यवसाय चालू करून दिले. यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळाला. त्यामुळे या महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात येत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी या वेळी घोषित केले.
स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा https://t.co/Pc1kUx07GI
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 25, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकच्या माथाडी कामगारांचा लेव्हीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल. माथाडी कामगार चळळीत काही चुकीचे लोक घुसले आहेत. या वसुली करणार्यांना कारागृहात टाकणार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा प्रश्न सोडवणे कठीण होते; परंतु अधिक एफ.एस.आय. (चटई क्षेत्र निर्देशांक) देऊन तो प्रश्न मार्गी लावला. या पुढील काळातही यासाठी निधी अल्प पडू देणार नाही.
माजी आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी वाशी येथील ट्रक टर्मिनल येथे चालू असलेल्या गृहप्रकल्पात माथाडी कामगारांना घरे देण्याची मागणी केली. ते या वेळी म्हणाले की, आता सत्तेत असलेले सरकार हिंदुत्वाचा द्वेष करणार्यांना जशास तसे उत्तर देईल.
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंवण्यात येणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीपुणे येथे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात देशद्रोही कृत्य खपवून घेणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईत माथाडी कामगार संघटनेच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. |