‘कन्व्हेअर बेल्ट’द्वारे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत मागणी

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. संभाजीराव भोकरे (पत्रकारांना संबोधित करतांना), सर्वश्री किरण दुसे, किशोर घाटगे, अधिवक्ता सुधीर-वंदूरकर-जोशी, श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. विजयकुमार पाटील

कोल्हापूर – गणेशोत्सव हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा धार्मिक उत्सव आहे. श्री गणेशाचे आगमन होते आणि श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भाविक मनोभावे धार्मिक पूजा-अर्चा अन् परंपरांचे पालन करत भक्तीभावाने कृती करतो. त्यामुळे गणरायाचे विसर्जन हेसुद्धा विधीवत् होणे अत्यंत आवश्यक आहे आणि याला धर्मशास्त्रामध्ये आधार आहे. असे असतांनासुद्धा पाण्याची कोणतीही उणीव नसतांना केवळ मन मानेल तसा कारभार करत स्वत:ला आधुनिकतावादी असल्याचे दाखवत या कृतीतून कोल्हापूर महानगरपालिका हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवत श्रद्धांचे भंजन करत आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘यांत्रिक पद्धती’ची (‘कन्व्हेअर बेल्ट’ची) व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने कोल्हापूर येथे ८ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री बाबासाहेब भोपळे, संभाजीराव भोकरे, किरण दुसे (पत्रकारांना संबोधित करतांना), किशोर घाटगे, अधिवक्ता सुधीर-वंदूरकर-जोशी, श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. विजयकुमार पाटील

या प्रसंगी विश्‍व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी आणि श्री. विजयकुमार पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, तसेच श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, आदित्य शास्त्री, बाबासाहेब भोपळे, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.

१. महापालिकेला जर विसर्जनासाठीच ‘रोलर’चा वापर करायचा असेल, तर ताबूत विसर्जन अथवा अन्य कुणाच्या विसर्जनासाठी ते वापरण्यात यावे, हिंदूंच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी त्याचा वापर करण्यास आमचा विरोध आहे !

२. महापालिकेने पंचगंगा नदीकाठावर बॅरिकेड्स लावून बंदी केल्यामुळेच अनेक भाविकांना इच्छा असूनही पंचगंगा नदीत विसर्जन करता आले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आजूबाजूच्या काही गावांमध्ये भाविकांनी १०० टक्के श्री गणेशमूर्ती विसर्जन केले. याचा अर्थ भाविकांना विसर्जन करण्याची इच्छा असून प्रशासन भाविकांवर कुंडाचा निर्णय लादू शकत नाही.

३. दुसर्‍या बाजूला भाविकांकडून दान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खाण येथे फेकून देतांनाचा ‘व्हिडिओ’ समोर आला असून भाविकांच्या धर्मभावनांचा हा अपमान आहे. या संदर्भात भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनीही ट्वीट करून ही पद्धत अयोग्य असल्याचे सांगितले आहे. तरी या निमित्ताने भाविकांनी श्रद्धेने दान म्हणून दिलेल्या, तसेच कुंडात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खाणीत फेकणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या पुढील उर्वरित दिवसांमध्ये गणेशमंडळांना, तसेच गणेशभक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्तीविसर्जन करण्यास आडकाठी आणू नये, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

क्षणचित्रे

१. या प्रसंगी एका पत्रकाराने ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार कशी असावी ? तसेच ती शाडूमातीची असावी’, यांसाठी हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे सातत्याने प्रबोधन करत आहे’, असे निदर्शनास आणून दिले.

२. ‘यांत्रिक पद्धतीने केलेल्या विसर्जनाचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. तरी याला तुमचा विरोध का ?’ असे पत्रकारांनी विचारले असता श्री. किरण दुसे यांनी ‘अशा प्रकारे विसर्जन करणे हे शास्त्रसंमत नाही’, अशी ठाम भूमिका मांडली. (हिंदूंमध्ये असलेल्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच यांत्रिक पद्धतीने केलेल्या विसर्जनाच्या ‘विकृती’चे कौतुक होते, हे लक्षात घ्या ! – संपादक)