भंडारा येथे महिलेवर सामूहिक बलात्कार: दोघांना अटक

८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, १ आरोपी पसार

भंडारा – साहाय्य करण्याच्या बहाण्याने ३५ वर्षीय महिलेवर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत सामूहिक बलात्कार करण्यात आला. महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमित सार्वेे आणि महंमद अन्सारी यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील १ आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

१. अत्याचारपीडित महिला गोंदिया जिल्ह्यातीला गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पतीने नांदवायला नकार दिल्यानंतर पीडिता तिच्या बहिणीच्या घरी रहात होती.

२. ३० जुलै या दिवशी किरकोळ कारणावरून तिचा बहिणीशी वाद झाला. यामुळे ती रागाच्या भरात माहेरी जाण्यास निघाली; मात्र साहाय्य करण्याच्या बहाण्याने एका चारचाकी वाहनाच्या चालकाने तिच्यावर २ दिवस बलात्कार करून ३१ जुलै या दिवशी तिला अरण्यात सोडून दिले.

३. १ ऑगस्ट या दिवशी कान्हालमोह (जिल्हा भंडारा) येथे साहाय्याच्या बहाण्याने दोघा नराधमांनी पीडित महिलेवर शेतात बलात्कार केला. पीडिता रात्रभर तशीच पडून होती.

४. अत्याचारांमुळे तिची शुद्ध हरपली होती. कान्हालमोह येथील गावकर्‍यांनी तिला साहाय्य केले.

५. आरोपींनी पीडितेच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमा केल्या आहेत. प्रचंड रक्तस्रावामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

६. भाजपच्या नेत्या सौ. चित्रा वाघ यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली. त्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाकडे तिच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘पीडितेने तिची शुद्ध हरपण्यापूर्वी आधुनिक वैद्यांना घटनेमध्ये ४ आरोपी असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी ‘आतापर्यंत २ आरोपींना अटक केली असून एकाला लवकरच अटक होईल’, असे सांगितले आहे; परंतु चौथा आरोपी कोण आहे ? हा प्रश्‍न आहे. ती शुद्धीवर आल्यावरच याविषयी कळू शकेल.’’

‘यापुढे असे कृत्य कुणी करू धजावणार नाही’, असे कठोर शासन आरोपींना करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांना आदेश

या घटनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आय.पी.एस्. दर्जाच्या महिला पोलीस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील विशेष अन्वेषण पथकाच्या (‘एस्.आय.टी.’च्या) वतीने करण्यात येईल. आरोपींच्या मुसक्या आवळून ‘यापुढे असे कृत्य कुणी करू धजावणार नाही’, असे कठोर शासन पोलिसांनी त्यांना करावे.’’ या प्रकरणाचे अन्वेषण जलदगती न्यायालयाद्वारे करण्याचीही सूचना त्यांनी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशीही चर्चा केली आहे. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दोषींवर कठोर कारवाई करा ! – डॉ. नीलम गोर्‍हे, सभापती, विधान परिषद

‘भंडारा येथील महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी’, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ६ ऑगस्ट या दिवशी दिले. डॉ. गोर्‍हे यांनी पीडित महिलेचे कुटुंबीय आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा करून पीडितेच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना धीर देत या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी कायदेशीर साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले.

भंडारा येथील पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनीही ‘या घटनेचे जलदगतीने अन्वेषण करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी बलात्कार करणार्‍यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !