भाजपकडून स्थानिक पक्ष संपवण्याचे घृणास्पद कारस्थान चालू आहे ! – उद्धव ठाकरे

मुंबई – राजकारण आता घृणास्पद होत चालले आहे. इतर पक्ष संपवण्याची हौस असेल, तर जनतेपुढे जा. जनतेपुढे विचार मांडा. काँग्रेसने देशावर ६५ वर्षे राज्य केले, त्या काँग्रेसची काय स्थिती झाली, हे पहा आणि त्यानंतर बढाया मारा. भाजपकडून स्थानिक पक्ष संपवण्याचे घृणास्पद कारस्थान चालू आहे, असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी ते म्हणाले,

१. संजय राऊत यांच्याविषयी मला अभिमान आहे. ते माझे मित्र असून निर्भीड शिवसैनिक आहेत. त्यांचा गुन्हा काय आहे ?

२. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्थानिक पक्ष संपवण्याविषयी केलेले वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. ‘ते आपले गुलाम होतील’, हे भाजपचे धोरण देशाला गुलामगिरीकडे नेणारे आहे.

३. ‘राजकारण हा बुद्धीबळाचा खेळ आहे’, असे म्हटले जाते; परंतु भाजप केवळ बळाचा उपयोग करत आहे. आज बळ आहे; म्हणून भाजप अन्य पक्षांना संपवत असेल, तर सर्व दिवस सारखे नसतात, हे त्याने लक्षात घेतले पाहिजे. दिवस फिरले, तर काय होईल, हे लक्षात घ्या.

४. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो; परंतु मुख्यमंत्रीपद डोक्यात गेले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सत्ता येते आणि जाते. लोकांशी नेहमी नम्र रहा’, असे सांगितले. त्यामुळे निर्बुद्धपणे वागू नका. काळ पालटत रहातो. आपण जसे वागतो, त्यापेक्षा तो आपल्याशी अधिक निर्घृणपणे वागतो.

५. हिंदुत्वामध्ये फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, हे भाजपचे कारस्थान भेसूरपणे चालू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राविषयी नुकतेच केलेले वक्तव्य हे त्याचेच लक्षण आहे.’’