सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले निर्मित ‘गुरुकृपायोग’ हा अष्टांग साधनामार्ग कलियुगासाठी अत्यंत आवश्यक आणि पुढे पुन्हा येणार्‍या त्रेता अन् द्वापर या युगांसाठीही उपयुक्त असणे

१. गुरुतत्त्व अनादि काळापासून असून त्याचा महिमाही अनादि काळापासून असणे

अ. ‘गुरुतत्त्व अनादि काळापासून आहे. शिव हा पहिला गुरु आणि पार्वती ही पहिली शिष्या आहे. शिवाने पार्वतीला ‘गुरुगीता’ सांगितली. त्यामध्ये शिवाने पार्वतीला गुरु आणि गुरुकृपा यांचे माहात्म्य विस्ताराने सांगितले आहे. शिवाने सांगितलेला ‘गुरुकृपा हि केवलं शिष्य परममंगलम् ।’

(अर्थ : केवळ गुरुकृपेमुळे शिष्याचे परम मंगल होते.), हा श्लोकही सुप्रचलित आहे.

आ. गुरुदेव दत्तात्रेयाचेही अनेक शिष्य होते. गुरु-शिष्यांच्या अनेक पौराणिक कथाही आहेत.

थोडक्यात ‘गुरुकृपामाहात्म्य’ अनादि काळापासून आहे.

पू. संदीप आळशी

२. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले निर्मित ‘गुरुकृपायोग’ या अष्टांग साधनामार्गाचे वैशिष्ट्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगाच्या’अंतर्गत ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग आणि प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’ ही ८ अंगे सांगितली आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत या ८ अंगांचा जेवढा सूत्रबद्धरित्या, पद्धतशीर आणि प्रायोगिक स्तरावर विचार केला आहे, तेवढा आतापर्यंत कुणीच केलेला नाही ! यासाठीच ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे आचरण केल्याने साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होत आहे. १३.५.२०२२ पर्यंत १२१ साधक संत बनले असून,१ सहस्र १२१ साधक संत बनण्याच्या मार्गावर आहेत !’ – पू. संदीप आळशी

३.  कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ महत्त्वाचे असल्याने ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करणे श्रेयस्कर !

‘सत्ययुगात सर्वसामान्य व्यक्तींमध्ये स्वभावदोष आणि अहं नसायचे. त्रेतायुग आणि द्वापरयुग या युगांमध्ये सर्वसामान्य व्यक्तींमध्ये स्वभावदोष अन् अहं यांचे प्रमाण अल्प असायचे. त्यामुळे त्यांना त्या काळात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तीयोग यांसारख्या विविध साधनामार्गांनी साधना करणे सोपे होते. कलियुगात सर्वसामान्य व्यक्तींमध्ये स्वभावदोष अन्  अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे कोणत्याही मार्गाने साधना करण्यासाठी प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक ठरते. यासाठीच कलियुगाच्या दृष्टीने ‘गुरुकृपायोग’ या  साधनामार्गामध्ये ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ याला अधिक महत्त्व दिले आहे. या पार्श्वभूमीवर ‘गुरुकृपायोग’ हा कलियुगासाठी अत्यंत आवश्यक आहे.’ –  (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१६.१२.२०२१, सकाळी ९.५५)

४. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रिया त्रेता अन् द्वापर या युगांसाठीही उपयुक्त असणे

‘त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये माणसांमध्ये स्वभावदोष अन् अहं नसतातच, असे नसून कलियुगातील माणसांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रिया ही कलियुग संपल्यानंतर येणार्‍या त्रेता अन् द्वापर युगांमध्येही उपयोगी पडणारच आहे.’

– पू. संदीप आळशी (१७.१२.२०२१)