जनतेचे रौद्ररूप : श्रीलंका जळत आहे !

श्रीलंकेत जनतेकडून करण्यात येत असलेली जाळपोळ

जनतेच्या पैशांची लूट, चंगळवादी जीवन, सर्व भौतिक सुखांचा मनमुराद आनंद, पुढच्या २५ पिढ्यांची तरतूद, आप्तेष्टांना सरकारी आर्थिक लाभ, राजकारणातून मिळालेल्या पैशांतून गुंडांच्या टोळ्या पोसणे आणि निवडणुकीत त्याचा दुरुपयोग करून सत्ता काबीज करणे, हे राजकारण्यांकडून होत असते. हे सर्व करत असतांना मतदारांना गृहित धरणे, जनतेला वेठीस धरणे आणि जनतेच्या मूलभूत आवश्यकतांकडे दुर्लक्ष करणे आदी होते. परिणामी श्रीलंकेतील जनतेचा संयम तुटला. पोटात आग पडली की, माणूस राक्षस बनतो. हा त्याचा दोष नाही.

उद्रेक झालेल्या जनतेने श्रीलंकेचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची निवासस्थाने कह्यात घेणे

श्रीलंकेचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी केवळ अन् केवळ स्वतःच्या कुटुंबियांसाठी देशाची लूट केली. यामुळे देशाच्या आर्थिक नियोजनाचे तीनतेरा वाजले. अराजक माजले. लाखोंच्या संख्येने जनता बेफाम होऊन रस्त्यांवर उतरली. हा उद्रेक एवढा आहे की, देशाच्या प्रमुखांच्या आलिशान निवासस्थानांवरच जनतेने आक्रमण केले. श्रीलंकेत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची निवासस्थाने जनतेने स्वतःच्या कह्यात घेतली. त्या वेळी ते दोघे निवासस्थानांच्या चोर दरवाज्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाले.

– अधिवक्ता नकुल पार्सेकर, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.


जनतेने राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसून तो कह्यात घेतला आणि जे भौतिक सुख देशाचे हे नेते घेत होते, त्याचे क्षणिक सुख का होईना, ते आंदोलक घेत आहेत.

कोण कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जीमचा आनंद घेत आहे, कुणी पोहण्याचा, तर कुणी राष्ट्रपतींच्या शयनगृहाचा अनुभव घेत आहे. लाखोंच्या संख्येने आक्रमक झालेल्या श्रीलंकेच्या जनतेला आवरणे पोलीस आणि सैन्य यांनाही शक्य नाही. एवढेच नव्हे, तर जनतेने पंतप्रधानांच्या निवासालाही आग लावली.


श्रीलंकेत जनतेने केलेल्या उद्रेकातून सर्वत्रच्या शासनकर्त्यांनी घ्यावयाचा धडा !

जनता एवढी आक्रमक का झाली ? पंतप्रधानांचे निवासस्थान कह्यात घेऊन आंदोलकांनी तेथे फलकही लावला, ‘पंतप्रधानांचे निवासस्थान सामान्य लोकांसाठी खुले राहील.’ जनतेच्या पैशात मौजमजा करून तिला भिकेला लावणार्‍या शासनकर्त्यांनी सदासर्वकाळ जनतेला फसवता येत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. वेळ यावी लागते. या घटनेने अवघ्या जगाला धडा दिलेला आहे. सत्तेचा माज करून जर सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर जी जनता तुम्हाला डोक्यावर घेते, तीच तुमची थडगी बांधायला मागे पुढे पहाणार नाही. श्रीलंकेचे हे दोन्ही नेते आणि त्यांचे कुटुंबीय सुख विलासात मौजमजा करत होते. ते सरकारी पैसा लुटून नातेवाइकांना लाभ मिळवून देत होते. अखेर शेवट झाला आणि सरकारी निवासस्थानांवर जनतेने उग्र रूप धारण करत ते कह्यात घेतले.

शासनकर्त्यांनो, सावधान ! संयमाने घ्या. तुम्ही जनतेच्या पैशात मौजमजा करत आहात. जनतेला कायमस्वरूपी गृहीत धरू नका.

– अधिवक्ता नकुल पार्सेकर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

(साभार : फेसबूक)