मुंबई – मागील २ वर्षांपासून रिक्त असल्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ३ जुलै या दिवशी भाजपचे अधिवक्ता राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार, अपक्ष आमदार आणि अन्य छोट्या पक्षांचे आमदार यांच्या पाठिंब्याने अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत १६४ मते मिळवली. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी ५७ मतांनी राजन साळवी यांचा पराभव केला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, रईस शेख आणि एम्.आय्.एम्.चे आमदार शाह फारूख अन्वर हे तटस्थ राहिले. अध्यक्षपदासाठी एकूण २७१ आमदारांनी मतदान केले. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.
Rahul Narvekar of BJP elected Maharashtra Assembly Speaker
— Press Trust of India (@PTI_News) July 3, 2022
अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांना मतदान करावे, यासाठी शिवसेनेने पक्षादेश काढला होता; मात्र शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाने अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना पाठिंबा दिला. या वेळी शिवसेनेचे गटनेते आमदार अजय चौधरी यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करतांना प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात जाऊन अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना पाठिंबा दिल्याचे नमूद केले. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि सौ. मुक्ता टिळक हे प्रकृतीच्या कारणास्तव मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी १६ (न फुटलेले आमदार) आमदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना, तर ३९ आमदारांनी (फुटलेले आमदार) अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना पाठिंबा दिला. प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आदी छोट्या पक्षाच्या आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले.
महाविकास आघाडीच्या संख्याबळापेक्षा प्रत्यक्ष मतदानात घट !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५४ आमदारांपैकी अनिल देशमुख आणि नवाब मलिक कारागृहात असल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रभारी अध्यक्षपदी असल्यामुळे नियमानुसार अध्यक्षांना ‘टाय’ (समान) झाले, तरच मतदान करता येते. त्यामुळे झिरवाळ यांना मतदान करता आले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस ४, तर काँग्रेसचे २ आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदान घटले.
अशी झाली मतदानाची प्रक्रिया !
१. सकाळी ११ वाजता ‘वन्दे मातरम्’ने विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला प्रारंभ झाला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अधिवक्ता राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. महाविकास आघाडीच्या वतीने चेतन तुपे यांनी अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला आमदार संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले.
२. प्रस्ताव आल्यावर ५ मिनिटे थांबून प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अधिवक्ता राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्या नावांचे प्रस्ताव क्रमाने मतदानास घेतले.
३. मतदानाला प्रारंभ करण्यापूर्वी सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर प्रारंभी अधिवक्ता राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांना पाठिंबा देणार्या आमदारांची अन् त्यानंतर तटस्थ रहाणार्या आमदारांची मोजणी करण्यात आली.
४. मतदानानंतर थोड्याच वेळात प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मतांची आकडेवारी घोषित करून अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना विजयी घोषित केले.