गोव्यात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी !
रामनाथी (गोवा), १४ जून (वार्ता.) – आज देशामध्ये प्रत्येक वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे. अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे.
धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम २५ मध्ये सुधारणा करून त्यातील ‘धर्माचा प्रचार करणे’ (Propagate Religion) हे शब्द काढले पाहिजेत. त्यासमवेत गोवा सरकारने विधानसभेत या संदर्भातील ठराव पारित करून केंद्रशासनाला पाठवला पाहिजे, तरच अवैध धर्मांतरावर संपूर्ण बंदी येईल. स्वत:च्या धर्माचे पालन करण्यावर कोणतीही आडकाठी आणण्याची आवश्यकता नाही; मात्र इतरांना फसवून, बळजोरी करून किंवा त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन केल्या जाणार्या धर्मांतरावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेचे माजी प्रभारी महासंचालक श्री. एम्. नागेश्वर राव यांनी केली. ते दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिनी फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’तील विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
कायदेतज्ञांचा गट धर्मांतरविरोधी कायद्याचा अभ्यास करत आहे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी – माझ्या कायदेतज्ञांचा गट धर्मांतरविरोधी कायदा आणि धर्मांतर यांचा अभ्यास करत आहे. धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचा निर्णय कायदेतज्ञांच्या गटाकडे बोलल्यानंतर घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्याचा इतिहास माहिती असल्यानेच मी पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करण्याचे वक्तव्य केले. माझे सरकार स्थिर आहे.’’ |
या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ख्रिस्ती पंथ सोडून हिंदु झालेल्या तेलंगणा येथील श्रीमती एस्थर धनराज, छत्तीसगड येथे लाखो हिंदूंची घरवापसी करणारे भाजपचे प्रदेशमंत्री श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव आणि नेपाळ येथील विश्व हिंदु महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खरेल उपस्थित होते.
धर्माचरण केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाही ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृती करून त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण प्रारंभ केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी धर्मांतरबंदी कायदा करण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. गोव्यात डॉम्निक आणि अन्य ख्रिस्ती प्रचारकांकडून जे धर्मांतर चालू आहे, ते रोखण्यासाठी गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासह राज्यघटनेत पालट करायला हवा.
धर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धर्म समिती स्थापन झाली पाहिजे ! – श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, छत्तीसगड, भाजप
हिंदूंच्या धर्मांतर करणार्या विदेश शक्तींकडे प्रचंड पैसा आणि साधने आहेत. माझ्या वडिलांनी लाखो हिंदूंची, तर मी १५ सहस्र हिंदूंची घरवापसी केली आहे; मात्र हे करतांना आमच्यावर जीवघेणी आक्रमणे मिशनरी, नक्षलवादी यांच्याकडून झालेली आहेत. धर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धर्म समिती स्थापन करून धर्मसेना उभी केली पाहिजे. त्याने चांगला लाभ झालेला आहे.
नेपाळ येथील श्री. शंकर खरेल म्हणाले, ‘‘नेपाळमध्ये ३ कोटी लोकसंख्येच्या देशात ३० लाख लोक धर्मांतरित झाले आहेत. हे चिंताजनक आहे. हे धर्मांतर रोखण्यासाठी गरिबी, शिक्षण आणि अन्य मूलभूत गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे.’’ तेलंगणा येथील एस्थर धनराज म्हणाल्या की, मी स्वत: ख्रिश्चन होते; मात्र अमेरिकेत गेल्यावर बायबलचा अभ्यास केल्यावर त्यात तर्कशास्त्र नसल्याचे लक्षात आले. पुढे भारतात आल्यावर मिशनरी लोकांकडून धर्मांतरासाठी चाललेली षड्यंत्रे पाहून त्याविरोधात जागृती करणे मी चालू केले. तसेच धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मांत आणण्याचे आणि युवकांना समुपदेशन करण्याचे काम करत आहे.’’
पत्रकार परिषद प्रश्नोत्तरे
१. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘भारतात जर सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्म समान आहेत, तर ‘धर्मांतर’ करण्यास भारतात अनुमती का ? स्वातंत्र्यानंतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. ती करण्यास शासनाकडून अनुमती कशी काय मिळाली ?
२. भारतीय व्यवस्थेतील अनेक यंत्रणा या शब्दच्छलात अडकल्या आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेसह अनेक यंत्रणांकडून अपेक्षित न्याय मिळत नाही. हिंदु राष्ट्रात मात्र अयोग्य कृती करणार्यांना कठोर शिक्षा केली जाईल.’’