राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपचे धनंजय महाडिक विजयी !

पत्रकारांशी बोलतांना भाजपचे देवेंद्र फडणवीस व विजयी उमेदवार

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत ६ जागांपैकी भाजपचे ३, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १ उमेवार विजयी झाले. ६ व्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार, तर भाजपचे धनंजय महाडिक रिंगणात होते. यामध्ये अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. यासह भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाले.

विधानसभेच्या २८८ आमदारांतील नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे सध्या कारागृहात आहेत. त्यांना मतदान करण्यास न्यायालयाने अनुमती नाकारली. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले असल्यामुळे ६ व्या जागेसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. ६ व्या जागेसाठी दोन्ही उमेदवारांकडे आवश्यक मते नसल्याने निवडून येण्यासाठी दोन्ही उमेदवारांना अपक्ष आमदारांच्या मतांची आवश्यकता होती. अपक्ष आमदारांची मते गुप्त मतदान पद्धतीने देण्यात आली. अपक्ष आमदारांनी भाजपच्या पारड्यात मते टाकल्याने धनंजय महाडिक विजयी झाले. राज्यात सत्तेत असूनही राज्यसभा निवडणुकीत भाजपचा हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. भाजपचे एकूण १०६ आमदार आणि समर्थक अपक्ष ७ आमदार असे भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ होते. यांमध्ये पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते मिळाली, तर भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. प्रफुल्ल पटेल ४३, इम्रान प्रतापगढी ४४, संजय राऊत ४१, तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली.