पास्टर डॉम्निक याच्यावरील कारवाईविषयी गोव्यातील हिंदुत्वनिष्ठांच्या प्रतिक्रिया

‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक आणि सोबत त्याची पत्नी

म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अभिनंदनास पात्र ! – श्री. अंकित साळगावकर, अवैध धर्मांतराच्या विरोधात अनेक वर्षे लढा देणारे हिंदुत्वनिष्ठ

हिंदुत्ववानिष्ठ अंकित साळगांवकर

‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला ‘फाईव्ह पिलर्स चर्च’मध्ये जाऊन अटक करणारे म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, तसेच पोलिसांना या कामी पूर्ण मोकळीक देणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अभिनंदनास पात्र आहेत. या कारवाईमुळे ‘गोव्यात धर्मांतर होत नाही’, असे म्हणणार्‍यांना चपराक बसली आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून पास्टर डॉम्निक आणि फाईव्ह पिलर्स चर्च यांच्या धर्मांतराच्या कारावाया उघड करण्याचा मी प्रयत्न करत आहे; मात्र पास्टर डॉम्निक आणि त्यांच्या प्रभावाने धर्मांतरित झालेले हिंदू हेच माझ्या विरोधात अनेक तक्रारी करत आहेत. विशेष म्हणजे माझ्याविरोधात एकाही ख्रिस्त्याने तक्रार नोंदवलेली नाही. तक्रार करणारे केवळ धर्मांतरित हिंदूच आहेत. माझ्याविरोधात घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. खरे तर तक्रारदारांनीच घटनात्मक अधिकाराचा अपवापर केला आहे. पास्टर डॉम्निक याने ‘मी पुणे येथे रहातो’, असे खोटे सांगून माझ्याविरोधात पुणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

इस्लामचा प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधातील कारवाईच्या धर्तीवर पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई करावी ! – श्री. प्रशांत वाळके, हिंदुत्वनिष्ठ

पास्टर डॉम्निक याचा भोंदूपणा आज उघडकीस आला आहे. इस्लामचा प्रचारक डॉ. झाकीर नाईक भारतात अटक टाळण्यासाठी विदेशात जाऊन लपून बसला आहे. डॉ. झाकीर नाईक यांच्यावर धर्मांतर कारवायांच्या विरोधात जी कलमे लावून कारवाई करण्यात येत आहे, तशीच कलमे लावून पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई करावी.

भोंदू पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई करावी ! – श्री. राजीव झा, हिंदू वाहिनी

भोंदू पास्टर डॉम्निक ‘होली कम्युनियन’ या नावाने धर्मांतर करतो. ‘येशू’चे रक्त या नावाने एक लाल रंगाचे पेय, तर येशूच्या मांसाचे तुकडे म्हणून पावाचे तुकडे दिले जातात. हे पेय प्यायल्यानंतर आणि पाव खाल्यानंतर ‘तुम्हाला आता ‘बिलिव्हर्स’ व्हावेच लागणार आहे. ‘बिलिव्हर्स’ झाला नाहीत, तर तुम्हाला त्रास होणार’, अशी भीती आणि धमकी हिंदूंना दिली जाते. पास्टर डॉम्निक ‘हिप्नॉटिझम्’ (संमोहन) करतो. त्याच्यावर कठोर कारवाई करावी. पास्टर डॉम्निकवर कारवाई करणार्‍या गोवा सरकारचे अभिनंदन !

पास्टर डॉम्निकसारखे अजून पास्टर निर्माण होऊ नये, यासाठी गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा आणा ! – श्री. जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ

श्री. जयेश थळी

पास्टर डॉम्निक याने हिंदूंची अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करून समाजात द्वेषभावना पसरवली आहे. अंधश्रद्धा पसरवणार्‍या डॉम्निक यांच्या यापूर्वीच्या सर्व घटनांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. ‘बिलिव्हर्स’च्या ठिकठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांमधून पास्टर डॉम्निकसारखे अनेक पास्टर निर्माण होत आहेत. हे प्रकार कायमस्वरूपी रोखण्यासाठी गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा आणावा.

हिंदु समाजाला धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

सौ. शुभा सावंत

पास्टर डॉम्निक याला अटक होणे, हे धर्मांतराच्या विरोधातील चांगले पाऊल आहे. गरजूंना साहाय्य करण्याच्या नावे धर्मांतर करणे, हे एक षड्यंत्र आहे. अध्यात्मात जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय दिलेले आहेत. हिंदूंनी त्यांच्या जीवनात समस्या निर्माण झाल्यास अध्यात्मात त्याची उत्तरे शोधावी. हिंदू ‘बिलिव्हर्स’च्या कारवायांना बळी पडून स्वत:चा धर्म पालटतात. धर्मांतर म्हणजे मृत्यूला कवटाळणे होय. हिंदु समाजाला धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या दृष्टीने पावले उचलावीत. गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा. धर्मांतरित हिंदूंची ‘पुनर्वापसी’ करता येईल; मात्र हिंदूंनी हिंदु धर्माचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे.

विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि डिलायला लोबो यांचा पास्टर डॉम्निक याला पाठिंबा आहे ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा

प्रा. सुभाष वेलिंगकर

डॉम्निक आणि जोआना हे जोडपे गेल्या काही दशकांपासून गोव्यात धर्मांतराच्या कारवाया करत आहे. हे जोडपे केवळ शिवोली येथेच नव्हे, तर कुंभारजुवे आणि वास्को येथील केंद्रांच्या माध्यमांतूनही धर्मांतर करत होते. भोंदू बिलिव्हर पास्टर डॉम्निक याला अटक करून ‘धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही’, ही घोषणा सार्थ करणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हार्दिक अभिनंदन ! भोंदू बिलिव्हर पास्टर डॉम्निक याला आतापर्यंत राजकारण्यांनी पोसले. पास्टर डॉम्निक हे मोठे घबाड आहे. त्याचा अनेक अनैतिक आणि अनधिकृत कृत्यांमध्ये सहभाग आहे. त्याची पूर्ण चौकशी करण्यात यावी. गोव्यात आतापर्यंत त्याने सुमारे दीड लाख लोकांचे धर्मांतर केले आहे. ही किमान संख्या आहे. हिंदू महिलांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले आहे. मानसिक दुर्बलतेचा अपलाभ उठवून धर्मांतर केले जात आहे. तो जादूटोणा अथवा बंगाली जादू आदी प्रकारही करण्याची शक्यता आहे. पास्टर डॉम्निक याच्या आतापर्यंत उघडकीस आलेल्या या कारवाया हे हिमनगाचे टोक आहे. ‘विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि त्यांची पत्नी डिलायला लोबो या ‘बिलिव्हर्स’चे ‘फायव्ह पिलर्स चर्च’ असलेल्या शिवोली मतदारसंघाच्या आमदार असून दोघांचा पास्टर डॉम्निक याला पाठिंबा आहे’, असा माझा आरोप आहे.

सबळ पुराव्यानिशी पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई करावी ! – श्री. रमेश नाईक, माजी गोवा प्रमुख, शिवसेना

पास्टर डॉम्निक याने धर्मांतर केलेल्यांची नावे, पत्ते पोलिसांनी गोळा करावे. पास्टर डॉम्निक याचा भ्रमणसंगणक कह्यात घेऊन त्यातून त्याला विदेशातून धर्मांतर करण्यासाठी निधी कुठून मिळतो ? याविषयी इत्यंभूत माहिती गोळा करावी. सबळ पुराव्यानिशी पास्टर डॉम्निक यांच्यावर कारवाई करावी.

धर्मांतराला बळी पडलेल्यांनी पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन शासनाने करावे ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

पास्टर डॉम्निक हा लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्याचा दावा करतो; मात्र अटकेनंतर त्यालाच उच्च रक्तदाबाच्या व्याधीमुळे रुग्णालयात भरती करण्याची विनंती पोलिसांकडे करावी लागली. आरोग्याच्या तक्रारी दूर करण्याचा दावा करत हिंदु समाजात अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत. हिंदूंना फसवून त्यांच्या धर्मांतराद्वारे पास्टर डॉम्निक याने जी संपत्ती जमवली आहे, त्याची चौकशी करण्यात यावी, तसेच ‘या प्रकाराला बळी पडलेल्या पीडित हिंदूंनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात’, असे आवाहन पोलीस आणि शासन यांनी करायला हवे. पास्टर डॉम्निक हा अंगाला तेल लावून लोकांचे आजार बरे करण्याचा दावा करत होता. गोव्यात बांबोळी येथे मोठे शासकीय रुग्णालय असतांनाही अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवली जाते. अशांवर कारवाई करण्यात यावी.

संपादकीय भूमिका

धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा केल्यावरच ख्रिस्ती मिशनरींच्या कुकृत्याला चाप बसेल !