श्रीलंकेप्रमाणे आता पाकिस्तानही आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानची अर्थव्यवस्था झपाट्याने दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. पाकच्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत साधारण २०० च्या जवळ पोचले आहे. यासमवेतच डॉलरचा काळाबाजारही झपाट्याने वाढला असून तो रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने चैनीच्या आणि अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवर कडक बंदी घातली आहे.

१. गेल्या मासात, म्हणजेच ११ एप्रिलला शाहबाज शरीफ यांचे आघाडी सरकार सत्तेवर आले. तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया १८२ रुपये होता. त्यानंतर त्यात झपाट्याने घट झाली आहे.

२. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने विदेशी कर्जाचे हप्तेही भरले नाहीत. नवीन सरकारसाठी ही मोठी समस्या आहे.

३. याव्यतिरिक्त श्रीमंत वर्ग डॉलर्सचा साठा करत आहे. त्यामुळे त्याचा काळाबाजार होत आहे. येथे एका डॉलरसाठी २६० पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात.

४. अर्थव्यवस्थेची दुर्दशा पाहून पंतप्रधान शरीफ यांनी तातडीची बैठक बोलावली. अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्यासह वित्त सचिव आणि काही आर्थिक तज्ञ बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर लेखी निवेदन जारी करण्यात आले.