(म्हणे) ‘राज ठाकरे यांच्यावर गुन्हे नोंद न केल्यास न्यायालयात याचिका प्रविष्ट करू !’ – इम्तियाज जलील, खासदार, एम्.आय.एम.

संभाजीनगर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याविषयी जी समयमर्यादा दिलेली आहे, ती मुसलमान समाजाला नाही, तर महाराष्ट्र सरकारला दिली आहे. त्यांच्या भाषणाविषयी मुसलमान समाज कोणतीही भूमिका घेणार नाही, तसेच मुसलमान समाज त्यांच्या वक्तव्यांचा विरोधही करणार नाही. भोंग्यांचा निर्णय न्यायालयातच होत असतो त्याचा निर्णय रस्त्यावर होत नसतो. (सर्वाेच्च न्यायालयाने भोंग्याविषयी निर्णय दिलेला असतांनाही त्याचे मुसलमान पालन का करत नाहीत ? – संपादक) या सभेत नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अन्यथा मी न्यायालयात याचिका प्रविष्ट करीन, अशी चेतावणी येथील ‘एम्.आय.एम.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

भोंग्याला विरोध नाही, नियमाने जा !

मी राज्य सरकार आणि पोलीस यांना विनंती करतो की, हे सर्व चुकीचे चालू आहे. सभा करून निर्णय होत असेल, तर यापेक्षा दुप्पट सभा आम्ही घेऊ. भोंग्याला माझा विरोध नाही; मात्र नियमाने जायला हवे. नियम पाळायचे नसतील, तर पोलीस ठाणे बंद करून टाका. अल्लाऊद्दीन खिलजी याने काय केले ? हा इतिहास होता. जे चुकीचे झाले ते झाले. हा देश राजा आणि महाराज यांचा नाही. हे लोकशाहीचे राज्य आहे. तुम्ही उठाल आणि काहीही बोलणार हे योग्य नाही; पण आम्ही बोललो असतो, तर आमच्यावर गुन्हे नोंद केले असते. छोट्या प्रकरणात माझ्यावर १२ गुन्हे नोंद केले आहेत, असे जलील यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

भोग्यांसंदर्भात ‘नियमाने जा’ म्हणणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या चोराच्या उलट्या बोंबा !