केरळ उच्च न्यायालयाचे मंदिर सल्लागार समितीच्या अनास्थेवर ताशेरे !

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

  • निकृष्ट दर्जाचे पूजासाहित्य विक्रीवरून उच्च न्यायालयाची स्वत:हून नोंद !

कोट्टायम् जिल्ह्यातील वाईकोम महादेव मंदिर

थिरूवनंथापूरम् (केरळ) – कोट्टायम् जिल्ह्यातील वाईकोम महादेव मंदिरात निकृष्ट दर्जाच्या पूजासाहित्याची विक्री होत असल्याचे एका वृत्तातून लक्षात आल्यावर केरळ उच्च न्यायालयाने त्याची स्वत:हून नोंद घेतली. संबंधित वृत्तातून मंदिरात उपयोगात आणले जाणारे ‘कूवालम’ (बेलाचे पान) आणि अन्य ‘वळीपडू’ (पूजासाहित्य) हे हलक्या दर्जाचे असल्याचे समोर आले होते. न्यायालयाने मंदिराच्या सल्लागार समितीच्या अनास्थेवर ताशेरे ओढत तिला दायित्वाची जाणीव करून दिली. न्यायालयाने म्हटले, ‘शिवाला वहाण्यात येणारे बेलाचे पान हे भगवंताच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या कार्यांना दर्शवणारे असल्याने ते शुद्ध असणे आवश्यक आहे. समितीचे पूजासाहित्याच्या गुणवत्तेवर सतत लक्ष असणे अपेक्षित आहे. धार्मिक विधींमध्ये, तसेच पूजेमध्ये वापरण्यात येणारे पूजासाहित्य शुद्धच असायला हवे.’

या वेळी न्यायालयाने म्हटले की,

१. प्रशासकीय अधिकार्‍याची ही गंभीर चूक आहे. मंदिर सल्लागार समितीने त्रावणकोर देवस्वम् बोर्डाला मंदिराच्या कामकाजात साहाय्य करणे अपेक्षित आहे.

२. समितीने ‘मंदिरातील पारंपरिक विधी आणि उत्सव परंपरेनुसार साजरे केले जातात ना ?’, याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. तसेच ‘धार्मिक विधींशी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्यांना दिलेले कार्य पार पाडत आहेत ना’, हे पहायला हवे.

३. या वेळी न्यायालयाने पूजासाहित्याची विक्री करणारे दुकानदार, तसेच देवस्वम् बोर्डावरील संबंधित अधिकार्‍यांवर एका मासाच्या आत योग्य कारवाई करण्याची देवस्वम् आयुक्तांना आदेश दिले.

संपादकिय भूमिका

  • याचा अर्थ जर न्यायालयाने नोंद घेतली नसती, तर हा अपप्रकार चालूच राहिला असता ! यासाठीच मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करून त्यांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !
  • ‘मंदिरांचे व्यवस्थापन चांगले रहावे’ असे कारण देत त्यांचे सरकारीकरण केले जाते; परंतु अशा उदाहरणांतून त्यात घोडचुकाच होत असल्याचे लक्षात येते. या विरोधात आता हिंदूंनीच एकजूट होऊन मंदिरांचे सरकारीकरण रहित होण्यासाठी वैध मार्गाने आंदोलन उभारावे !