(टीप : ‘व्हॅक्युम बाँब’ म्हणजे वातावरणातील प्राणवायू शोषून घेऊन मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवणारा बाँब)
‘युक्रेनच्या मंत्र्याने दावा केला की, रशियाने त्यांच्या शहरावर ‘व्हॅक्युम बाँब’चा वापर केला आहे. याला ‘व्हॅक्युम बाँब’, ‘थर्माेबेरिक बाँब’ किंवा ‘फादर ऑफ ऑल बाँब्स्’ असेही म्हटले जाते. आपल्याकडील पारंपरिक बाँब जेव्हा फुटतो, तेव्हा त्यातून अतिशय वेगाने लोखंडाचे किंवा धातूचे अनेक तुकडे बाहेर पडतात आणि ते आजूबाजूच्या माणसांना मारतात. ‘व्हॅक्युम बाँब’ हा वेगळा प्रकार असून तो अतिशय शक्तीशाली आहे. असे म्हटले जाते की, त्याची शक्ती ‘४० टी.एन्.टी.’ इतकी आहे. याचा अर्थ त्यामध्ये ४० टन शक्ती आणि ‘टी.एन्.टी.’ नावाचा स्फोटक पदार्थ आहे. ४० टनाचा स्फोट झाला, तर जेवढा परिणाम होईल, तेवढी या बाँबची क्षमता असते.
‘व्हॅक्युम बाँब’चे कार्य
या बाँबच्या स्फोटामुळे तेथे प्रचंड प्रमाणात तापमान निर्माण होते. हवेतील प्राणवायू त्यामध्ये एकदम आकर्षित केला जातो आणि स्फोट झालेल्या केंद्रापासून प्राणवायू घेण्यासाठी हवा प्रचंड वेगाने बाहेरच्या दिशेने जाते. त्यामध्ये जे काही येईल, त्याला ते नष्ट करत जाते. तसेच यामध्ये एक पोकळी निर्माण झाल्याने पुन्हा एकदा दुसर्या दिशेने हवा परत येते. ज्याला आपण वादळ म्हणू शकतो. त्याची गती ९० ते १४० किलोमीटर प्रतिघंटा असते. प्रथम बाहेर जाणारे आणि दुसर्यांदा आत येणारे मोठे वादळ असते. यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. पुष्कळ उष्णता वाढल्याने सूर्यासारखे प्रचंड तापमान निर्माण होते. त्यामुळे पोकळीतील सर्व जळून नष्ट होते. आधुनिक काळातील सर्वांत मोठा आणि अतिशय धोकादायक असा हा बाँब आहे. या बाँबच्या पुढे एकच बाँब आहे आणि तो म्हणजे अणूबाँब ! रशियाने अणूबाँबचीही धमकी दिली आहे.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
रशियाने ‘व्हॅक्युम बाँब’ वापरणे, हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध !
रशियाने जर युक्रेनमध्ये ‘व्हॅक्युम बाँब’ वापरला असेल, तर ते अतिशय चुकीचे आहे; कारण आंतरराष्ट्रीय कायदा एवढा मोठा विध्वंसक बाँब वापरण्याची अनुमती देत नाही. त्यामुळे रशियाची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे. रशियाला रणभूमीवर अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे रशियन सैन्य कारवाईचा वेग वाढवण्यासाठी त्यांच्याकडील मोठमोठी शस्त्रे वापरत आहे. सध्या त्यांनी केवळ एकच घातक असा बाँब वापरला आहे. पुढे ते अधिक बाँब वापरू शकतात. यात युक्रेनची मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होईल. आशा करूया की, आंतरराष्ट्रीय समुदाय रशियावर दबाव टाकून त्याला अशा प्रकारचे बाँब न वापरण्याविषयी सांगेल !’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.