वर्ष १९९६ च्या चारा घोटाळ्याच्या ५ व्या प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

२१ फेब्रुवारीला सुनावणार शिक्षा

२६ वर्षांनंतर आरोपीला दोषी ठरवण्यात येत असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ? – संपादक

रांची (झारखंड) – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने बिहारमधील चारा घोटाळ्याच्या ५ व्या प्रकरणात, म्हणजेच ‘डोरंडा ट्रेझरी’मधून (डोरंडा तिजोरीमधून) अवैधरित्या १३९ कोटी ५० लाख रुपये काढल्याच्या प्रकरणी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना किती वर्षांची शिक्षा होणार किंवा त्यांना जामीन मिळणार कि नाही ?, याचा निर्णय २१ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील अन्य २४ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, तर ३४ जणांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह ४१ दोषींना शिक्षा होणार आहे.

चारा घोटाळ्याच्या एकूण ५ प्रकरणांमध्ये लालूप्रसाद यादव यांना आरोपी बनवण्यात आले होते. याआधी ४ प्रकरणांचा निकाल देण्यात आला असून या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. आता लागलेला निकाल हा ५ व्या प्रकरणाचा आहे. हा घोटाळा १३९ कोटी ५० लाख रुपयांचा आहे. वर्ष १९९६ मध्ये नोंदवण्यात आलेल्या या गुन्ह्यामध्ये एकूण १७० जण आरोपी होते. यातील ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे, तर ७ आरोपींना सीबीआयने सरकारी साक्षीदार बनवले आहे.