बुरखा घातला नाही, तर एम्.आय.एम्.वाले मुस्कान खान हिच्यावर आक्रमण करतील, तेव्हा आता पाठिंबा देणारे तिला साथ देतील का ? – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

उजवीकडे बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – मुस्कान खान हिने बुरखा घातला नाही आणि एम्.आय.एम्.च्या गुंडांनी तिच्यावर आक्रमण केले तर ? आता तिला पाठिंबा देणारे लोक तिला त्या वेळी पाठिंबा देतील का ?, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून विचारला आहे. कर्नाटकमध्ये हिजाबच्या प्रकरणात एका महाविद्यालयाबाहेर मुस्कान खान बुरखा घालून पोचल्यावर तेथे हिजाबचा विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांनी मुस्कान हिला पाहून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्या वेळी एकट्या मुस्कानने त्यांना ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत विरोध केला होता. त्यामुळे मुसलमानांकडून तिचे कौतुक होत आहे. एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही तिचे कौतुक केले आहे. यावरूनच तस्लिमा नसरीन यांनी वरील ट्वीट केले आहे.

तस्लिमा नसरीन यांनी यानंतर केलेले काही ट्वीट  

१. ‘हिजाब महिलेची आवड आहे’, असे म्हणणारे उद्या ‘४ पत्नींपैकी मी एक असणे हीसुद्धा महिलेची आवड आहे’, असे म्हणतील !

लोक म्हणतात ‘बुरखा किंवा हिजाब परिधान करणे, ही महिलांची निवड (चॉइस) आहे.’ लवकरच ते म्हणतील, ‘बहुपत्नी पुरुषाच्या ४ पत्नींपैकी एक असणे हीसुद्धा महिलेची ‘चॉइस’ आहे.’ कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणे, अनेक मुलांना जन्माला घालणे आणि मालमत्तेत समान वाटा न मिळणे, हीदेखील महिलांची ‘चॉइस’ आहे, अशी उपरोधिक टीका नसरीन यांनी केली आहे.

२. बुरखा आणि हिजाब घालण्यासाठी पालक दबाव टाकतात !

मुसलमान महिला जीन्स घालतात; कारण त्यांना आधुनिक महिलांसारखे व्हायचे आहे. मुसलमान महिला बुरखा आणि हिजाब घालतात; कारण त्यांचे पालक आणि नातेवाइक त्यांच्यावर दबाव टाकतात किंवा ते घालण्यासाठी लहानपणापासूनच त्यांचा बुद्धीभेद केला जातो.

३. बुरखा आरामदायी असता, तर सर्वांनीच परिधान केला असता !

जर बुरखा हा आरामदायी, फॅशनेबल, रुचकर आणि शोभिवंत पोशाख असता, तर केवळ मुसलमान स्त्रीच नाही, तर सर्व स्त्री-पुरुष आणि लहान मुले यांनी धार्मिकतेची पर्वा न करता तो परिधान केला असता.