… तर रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – अमेरिका

अमेरिकेचा युक्रेन प्रश्‍नावरून रशियाला इशारा !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (डावीकडे) रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (उजवीकडे)

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा युक्रेन मुद्यावरून रशियाला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये बोलतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले, ‘जर रशिया चर्चेच्या माध्यमातून आमच्या सुरक्षेच्या संदर्भातील चिंता दूर करण्यासाठी सिद्ध असेल, तर अमेरिका आणि आमचे सहकारी देश याच चर्चेच्या दिशेने पुढे जातील; मात्र रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील.’

रशिया-युक्रेन संघर्ष !

युक्रेनच्या सीमेवर रशियाने १ लाखाहून अधिक सैन्य जमवल्यामुळे क्रिमियाप्रमाणेच युक्रेनचा आणखी एखादा भूभाग कह्यात घेण्याचा रशियाचा उद्देश असावा, अशी चर्चा प्रामुख्याने पाश्‍चिमात्य प्रसारमाध्यमे आणि नेते यांच्यामध्ये चालू झाली आहे. दुसरीकडे रशियाकडून आक्रमणाचा आमचा कोणताही विचार नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे.

भारताची भूमिका काय ?

सध्या युक्रेन प्रश्‍नामुळे निर्माण झालेला तणाव न्यून करण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत, असे भारताने जागतिक मंचावरून सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस्.तिरुमूर्ति यांनी ‘अंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना धोका (युक्रेन)’ या विषयावरील चर्चेमध्ये त्यांची भूमिका मांडली.