सनातनची‘घरोघरी लागवड’ मोहीम
गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न
गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. प्रत्येकालाच यातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आचार्य देवव्रत यांच्या भाषणाचा सारांश असलेला हा लेख !
१. आचार्य देवव्रत यांनी आरंभी गुरुकुलाच्या दीड सहस्र निवासी विद्यार्थ्यांसाठी इतरांसारखी रासायनिक शेती करणे
मी स्वतः एक शिक्षक आहे. त्यासह मी शेतकरीही आहे. माझ्या शेतासाठी जो नियम आहे, तोच भारतातील प्रत्येक शेतकर्याच्या शेतासाठी आहे. मी कुरुक्षेत्र हरियाणामधील गुरुकुलाध्ये ३५ वर्षे प्राचार्य होतो. तिथे एका वेळी दीड सहस्र मुले निवासी पद्धतीने शिक्षण घेतात. त्यांच्या भोजनाठी अन्नधान्य पिकवण्याची व्यवस्था आमच्या गुरुकुलाच्या २०० एकर शेतात केली आहे. मी स्वतः ९० एकर शेती करून त्यातून त्या मुलांसाठी गहू, तांदूळ, कडधान्य आणि भाजीपाला यांची व्यवस्था करत असे. माझ्याकडे असलेली उर्वरित भूमी मी इतर शेतकर्यांना भाडेतत्त्वावर शेतीसाठी दिली होती.
२. शेतातील एक कामगार किटकनाशकाच्या वासाने बेशुद्ध पडल्यावर रासायनिक शेती ही विषयुक्त शेती असून ती चुकीची आहे, याची जाणीव होणे
एक दिवस एक घटना घडली. मला माझ्या शेतातून एक माहिती मिळाली की, ‘शेतातील एक कामगार कीटकनाशक फवारत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. किटकनाशकाच्या वासाने तो शेतात बेशुद्ध पडला.’ आम्ही त्याला रुग्णालयात नेले. २ – ३ दिवसांनी तो सामान्य स्थितीला आला. अशा घटना वारंवार घडतात, हे तुम्हा सर्व शेतकर्यांना माहीत आहे. त्या दिवशी माझ्या मनात एक विचार आला की, मी मुलांना जे अन्न खाऊ घालतो, त्यावर, म्हणजे गहू, तांदूळ, डाळी, भाजीपाला यांवर कीटकनाशके फवारत आहे. ज्या किटकनाशकाच्या नुसत्या वासाने हा कर्मचारी बेशुद्ध झाला, ते कीटकनाशक मी अन्नात घालून निष्पाप मुलांना देत आहे. याचा अर्थ मी मोठा अपराध करत आहे.’ त्या दिवसापासून मी ‘आता असे करायचे नाही’, असे ठरवले.
३. कृषी शास्त्रज्ञांच्या सांगण्यावरून सेंद्रिय शेतीला आरंभ करणे; परंतु तिच्यामधून रासायनिक शेतीएवढे उत्पन्न न मिळाल्याने शेतीत नुकसान होणे
मी कृषी शास्त्रज्ञांना, तसेच कृषी विभागाच्या लोकांना भेटलो. त्यांनी मला सांगितले की, ‘तुमच्याकडे सेंद्रिय शेतीचा पर्याय आहे. तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता.’ मी लगेचच खड्डे तयार केले. त्यात शेणखत टाकले. शेण खाणारी गांडुळे मागवली आणि पद्धतशीरपणे सेंद्रिय शेती चालू केली. पहिल्या वर्षी ५ एकरांत मी हे काम केले. मला काहीच उत्पन्न मिळाले नाही. किटकांनी सर्व उत्पन्न खाल्ले. पुढच्या वर्षीही मी ते तसेच चालू ठेवले. मला रासायनिक शेतीच्या जवळजवळ ५० टक्के उत्पन्न मिळाले. तिसर्या वर्षीही मी पुन्हा प्रयत्न केले. अथक परिश्रम केल्यानंतर मला कुठे अनुमाने ८० टक्के उत्पन्न मिळवता आले.
४. सेंद्रिय शेती हा नुसता देखावा असून सामान्य शेतकर्याला परवडणारी नाही, याची जाणीव होणे
तेव्हा मी विचार केला की, माझ्याकडे तर २०० एकर भूमी आहे. ज्या शेतकर्याकडे फक्त २ – ३ एकर भूमी आहे, त्याने ही सेंद्रिय शेती केली, तर त्याचे तर नुकसानच होणार. मग त्याची मुलेबाळे कशी जगणार ? या सेंद्रिय पद्धतीमुळे माझा खर्च काही न्यून झाला नाही. माझे श्रमही न्यून झाले नाहीत. उत्पादन मात्र घटले. ही शेती अशी चालवणे शक्य नाही. त्यामुळे पुन्हा रासायनिक शेतीच करावी का ? असे विचार माझ्या मनात येऊ लागले.
५. पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ५ एकर जागेत नैसर्गिक शेती करून पाहण्याचे ठरवणे
याच कालावधीत माझी ओळख सुभाष पाळेकर यांच्याशी झाली. श्री. सुभाष पाळेकर यांनी ‘नैसर्गिक शेती’या विषयावर मोठे काम केले आहे. मी त्यांना माझ्या गुरुकुलात बोलावून ५०० शेतकऱ्यांसाठी ५ दिवसांचे शिबीर ठेवले. त्यात स्वत: बसून मी नैसर्गिक शेतीची सर्व माहिती जाणून घेतली आणि माझ्या ५ एकर भूमीवर ‘नैसर्गिक शेती’ चालू केली.
६. नैसर्गिक शेतीमधून टप्प्याटप्प्याने रासायनिक शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न मिळणे
मला एक अतिशय सुखद अनुभव आला की, नैसर्गिक शेतीमधून पहिल्याच वर्षी मी रासायनिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाएवढे उत्पन्न घेऊ शकलो. त्याच्या पुढच्या वर्षी मी १० एकरांत नैसर्गिक पद्धतीने शेती केली. त्यातही चांगला अनुभव आला. त्यानंतर मी थेट ९० एकरांत नैसर्गिक शेती केली आणि माझे उत्पन्न जेवढे रासायनिक शेतीत येत होते, तेवढेच आले. आता माझे उत्पन्न रासायनिक शेतीपेक्षाही जास्त येत आहे.
७. शेतीतील रसायनांमुळे भूमी निकृष्ट झाल्याने शेतकर्यांनी भूमी भाडेतत्त्वावर घेण्याचे नाकारणे
वर्ष २०१७ मध्ये आणखी एक घटना घडली. माझ्या गुरुकुलची ११० एकर भूमी मी ज्या शेतकऱ्यांना गेली ३५ वर्षे भाडेतत्त्वावर देत होतो, त्या शेतकऱ्यांनी माझी ती भूमी सोडून दिली. त्या भूमीत काहीही उत्पन्न येत नाही. आमचा खर्चही त्यातून भागत नाही. त्यामुळे आम्ही तुमची शेती भाड्याने घेणार नाही, असे सांगून त्यांनी शेती सोडली. माझी काळजी वाढली; कारण मी त्यांना सुपीक भूमी दिली होती आणि ते म्हणत होते की, त्यात काहीही पिकत नाही !
८. शेतीतील हानीकारक रसायनांच्या वापरामुळे भूमीतील सेंद्रिय कर्बाचे (कार्बनचे) प्रमाण पुष्कळ घटणे
मी हिस्सार, हरियाणा येथील कृषी विद्यापिठातील ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख असलेले डॉ. हरि ओम यांना भेटून ही समस्या त्यांच्यासमोर मांडली. ते म्हणाले की, ‘मातीचा नमुना परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवा. मग भूमीची नेमकी काय स्थिती आहे, ते समजेल.’ आम्ही भूमीच्या वेगवेगळ्या भागांतील शेकडो नमुने घेऊन विद्यापिठाकडे पाठवले. अहवाल आला की, माझ्या भूमीतील सेंद्रिय कर्बाचे (कार्बनचे) प्रमाण ०.३ च्याही खाली गेले आहे. मी ‘याचा अर्थ काय ?’, असे विचारले तेव्हा डॉ. हरि ओम म्हणाले, ‘‘तुमची भूमी नापीक झाली आहे, असे शेतकरी जे म्हणत आहेत, ते खरे आहे. तुमच्या भूमीत काहीही उत्पन्न घेण्याची क्षमता राहिलेली नाही.’’
९. शेतीतील हानीकारक रसायने सेंद्रिय कर्ब निर्माण करणार्या जिवाणूंना मारून टाकत असल्याने भूमी नापीक होत असणे
मी संपूर्ण भारतातील शेतकर्यांना विनंती करतो की, तुम्ही ‘ही परिस्थिती का निर्माण झाली आहे’, याचा विचार करा. शेतकऱ्यांनी माझी भूमी भाड्याने घेतली. त्यांनी जास्तीतजास्त उत्पन्न यावे, यासाठी यूरिया, डीएपी आणि कीटकनाशके एवढ्या प्रमाणात वापरली की, माझी सुपीक भूमी नापीक झाली. संपूर्ण देशात भूमीची हीच परिस्थिती आहे. रासायनिक शेतीतील यूरिया, डीएपी, कीटकनाशके इत्यादींमुळे ज्यांच्यापासून सेंद्रिय कर्ब (कार्बन) निर्माण होतो, ती गांडुळे आणि जिवाणू मरतात. माझ्या शेतीतील हे उपयुक्त जीवाणू मेल्यामुळे माझी भूमी नापीक झाली होती.
स्वतःसाठी आवश्यक भाजीपाला घरच्या घरीच पिकवा !रासायनिक शेती आरोग्यासाठी किती हानीकारक आहे, हे या लेखातून लक्षात येते. बाजारातील भाजीपाल्यावर विषारी रसायनांची फवारणी केलेली असल्याने प्रत्येकाने स्वतःपुरता भाजीपाला स्वतःच पिकवून खाणे आवश्यक बनले आहे. घरच्या घरी थोड्याशा जागेतही दैनंदिन जेवणात आवश्यक असलेला भाजीपाला पिकवता येतो. यासाठीच सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत सनातनचे अनेक साधक घरच्या घरी भाजीपाला पिकवू लागले आहेत. – संकलक |