छत्तीसगडच्या एका गावातील नागरिकांकडून मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय

मुसलमान तरुणांनी गावकर्‍यांना मारहाण केल्याचे प्रकरण

ग्रामस्थ मुसलमानांवर बहिष्कार घालण्यासाठी शपथ घेताना

रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील बलरामपूर येथील कुंभकला गावातील काही ग्रामस्थांनी मुसलमानांवर बहिष्कार घालण्यासाठी शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे.

१ जानेवारी या दिवशी काही मुसलमान तरुण हे ख्रिस्ती नववर्षारंभ साजरा करण्यासाठी लुंड्रा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्‍या कुंभकला गावात पोचल्यावर त्यांचा स्थानिक तरुणांशी वाद झाला. या वेळी त्या धर्मांध तरुणांनी गावकर्‍यांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून ६ जणांना अटक केली. त्यांना नंतर जामीनही मिळाला. यामुळे अप्रसन्न झालेल्या गावकर्‍यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत, ‘या तरुणांवर कठोर कलमांच्या अंतर्गत कारवाई केली नाही. त्यामुळे ते जामिनावर मुक्त झाले’, असा आरोप केला. त्या वेळी गावकर्‍यांनी तेथेच शपथ घेतली, ‘आम्ही मुसलमानांशी यापुढे कोणताही संबंध ठेवणार नाही. त्यांच्या दुकानांतून काहीही विकत घेणार नाही आणि त्यांना भूमीही विकणार नाही.’ या वेळचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.