आध्यात्मिक त्रासांवर हास्यास्पद आणि वरवरच्या उपाययोजना करणारी निधर्मी लोकशाहीतील प्रशासकीय व्यवस्था !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘धर्मप्रसार करण्यासाठी भारतभर चारचाकी वाहनांतून प्रवास करतांना मला ठिकठिकाणी रस्त्यांवर ‘अपघातप्रवण क्षेत्र – कृपया वाहने सावकाश चालवा !’, असे बर्‍याच ठिकाणी लिहिलेले दिसले. जिज्ञासा म्हणून मी तेथील स्थानिक वाहनचालकांना विचारते, ‘‘असे लिहिल्याने येथे अपघात होत नाहीत का?’’ तेव्हा ते वाहनचालक सांगतात, ‘‘असे लिहूनही या मार्गावर आणि विशिष्ट जागेच्या आसपास अपघात होत असतात.’’

खरेतर अशी अपघातग्रस्त ठिकाणे सूक्ष्म-जगतातील वाईट शक्तींद्वारे (भूत-पिशाच आदींद्वारे) प्रभावित असतात. त्यामुळे त्या भागात किंवा विशिष्ट ठिकाणी अपघात होतात. यासाठी अशी ठिकाणे अध्यात्मातील जाणकारांना दाखवून त्या ठिकाणांची शुद्धी किंवा सुरक्षाकवच निर्माण करण्यासाठी नामजपादी उपाय करावेत; मात्र आपली निधर्मी प्रशासकीय व्यवस्था सूक्ष्म-जगतावर अजिबात विश्वास ठेवत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन बुद्धीने एखादे बोधवाक्य लिहून आपली सुटका करून घेते. अशा ठिकाणी वाहनचालकाला सावध करण्यासाठी जरी काही वाक्ये लिहिली, तरी वाईट शक्ती अतिशय हुशार असतात. त्या अशा ठिकाणांच्या अर्धा किलोमीटर आधीपासूनच चालकाला भ्रमित करतात. त्यामुळे दक्षतेसाठी माहितीचे फलक लावूनही अपघात होतच रहातात.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ

(२०.११.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.