पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
‘आर्य चाणक्य हे मगधचा राजा धनानंदकडून झालेला अपमान विसरू शकत नव्हते. सूडभावनेने त्यांनी शेंडीला गाठ मारली नाही. मोकळी शेंडी खुणावत होती की, धनानंद राजाला सिंहासनावरून पदच्युत करायचे आहे. चंद्रगुप्ताच्या रूपात त्यांना योग्य शिष्य मिळाला होता. त्याला त्यांनी लहानपणापासूनच परिश्रमपूर्वक सिद्ध केले होते. चाणक्य महान विद्वान होते, तर चंद्रगुप्त विलक्षण आणि अद्भुत शिष्य होता.
आर्य चाणक्य यांच्या सांगण्यावरून चंद्रगुप्ताने ५ सहस्र घोडेस्वारांची छोटी सेनाही तयार केली होती. एके दिवशी पहाटे सैन्य घेऊन त्यांनी मगधची राजधानी पाटलीपुत्रवर आक्रमण केले. चाणक्य धनानंदच्या सैन्याचे आणि रणनीतीचे योग्य आकलन करू शकले नाहीत आणि माध्यान्हीपूर्वीच चंद्रगुप्त अन् त्याच्या साथीदारांना धनानंदच्या सैन्याने अत्यधिक मारहाण करून परतवून लावले. चंद्रगुप्त स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाले. चाणक्यही एका घरात लपून बसले. शेजारीच एक आजी नातवाला जेवू घालत होत्या. आजीने गरम गरम खिचडीच्या मधोमध छिद्र करून गरम तूप वाढले होते. थोड्या वेळाने नातू ओरडला, ‘‘आजी, माझे बोट भाजले.’’
नातवाने खिचडीच्या मधे हात घालून घास खाल्ला. आजी म्हणाली, ‘‘तू चाणक्यासारखा मूर्ख आहेस. गरम खिचडीचा स्वाद घ्यायचा असेल, तर ती आधी बाजूने खायला हवी. तू मूर्खासारखा मधेच हात घातलास आणि आता रडत आहेस.’’ चाणक्य बाहेर येऊन वृद्धेच्या पायाला स्पर्श करत म्हणाले, ‘‘आपण योग्य सांगता की, मी मूर्खच आहे; म्हणून आरंभीच शत्रूच्या राजधानीवर आक्रमण केले. आज आपल्या सर्वांचे प्राण धोक्यात आहेत.’’ त्यानंतर चाणक्याने मगध राज्याला चारही बाजूंनी दुर्बळ करणे आरंभले. एके दिवशी चंद्रगुप्त मौर्याला मगधचा शासक बनवण्यात चाणक्य यशस्वी झाले.’
– पू. तनुजा ठाकूर (१२.११.२०२१)