डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त ‘सनातन प्रभात’च्या वतीने विनम्र नमस्कार !
प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना ९ नोव्हेंबर या दिवशी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत !
हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे !
मध्यमवर्गीय समाजात आपला धर्म किंवा संस्कृती यांविषयी आदर असतो; पण त्या संदर्भात कुणी सतत टीका करून त्यांना तुच्छ लेखत राहिले, तर त्याचा सडेतोड प्रतिवाद प्रत्येकाला करता येतोच असे नाही. लेखक, व्याख्याते आणि राष्ट्र अन् धर्म निष्ठ डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्यासारखे स्पष्टवक्ते, सडेतोड आणि कट्टर हिंदुत्वनिष्ठ अभ्यासक यांचा अशा वेळी मोठा आधार वाटतो ! डॉ. शेवडे यांनी आतापर्यंत हिंदुत्वाची जी विचारधारा सुस्पष्ट आणि ठामपणे वेळोवेळी मांडली आणि मांडत असतात, त्यामुळे सामान्य हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला निश्चितच साहाय्य झाले. पुरोगामी विचारांच्या प्रभावामुळे दिशाभूल झालेल्या हिंदूंना त्यामुळे दिशा मिळाली अन् योग्यायोग्यतेच्या सीमारेषेवर असलेल्या युवा पिढीलाही मार्गदर्शन मिळाले आणि मिळत आहे ! साम्यवाद्यांच्या हिंदुद्वेषी प्रसारामुळे सजग हिंदु तरुणांच्या मनावर विपरित परिणाम होतो. सनातन हिंदु धर्माची महती, तसेच जाज्वल्य इतिहास आणि राष्ट्रपुरुष यांची माहिती ज्ञात नसल्यामुळे काही वेळा हिंदु तरुणांना ठोस भूमिका घेता येत नाही; मात्र डॉ. शेवडे यांची हिंदुत्वाची प्रखर विचारधारा प्रवाहित करणारी ओघवत्या वाणीतील व्याख्याने आणि पुस्तके अशा युवकांसाठी खरोखरच प्रेरणादायी ठरली आहेत !
इतिहास आणि महापुरुष यांचे अभ्यासक !
आजही आपण सतत पहातो की, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेससह हिंदुद्वेषी वारंवार टीका करून हिंदूंचे खच्चीकरण करतात. अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची महानता जनमानसावर प्रतिबिंबीत करणार्या डॉ. शेवडे यांच्यासारख्या अभ्यासकांचे महत्त्व लक्षात येते. सनातन परंपरेत एवढे महान महापुरुष होऊन गेले, तेवढे जगाच्या इतिहासात खचितच आढळतील; पण दुर्दैवाने आजच्या तरुणांपुढे चुकीचे आदर्श आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. शेवडे यांच्यासारख्या अभ्यासकांची व्याख्याने आणि पुस्तके ही महापुरुष अन् क्रांतीकारक यांचे थोरपण उलगडून दाखवणारी असल्यामुळे निश्चितच हिंदु युवकांमध्ये पालट घडवणारी आहेत ! भगवान परशुराम, स्वामी विवेकानंद यांसह छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते विविध क्रांतीकारकांपर्यंत अनेकांची चरित्रे त्यांनी समाजासमोर उभी केली आहेत, त्या माध्यमातून हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र अस्मिता दृढ होण्यास साहाय्य झाले आहे. ‘काश्मीरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभ्यास’ याविषयावरच त्यांनी ‘डॉक्टरेट’ ही पदवी घेतली असल्याने त्यांनी काश्मीरप्रश्नाविषयी केलेले लिखाण हे आतून आलेले आहे.
हिंदुविरोधी सूत्रांचा निडर प्रतिवाद !
तत्त्वनिष्ठ डॉ. शेवडे यांनी वाहिन्यांवरील चर्चासत्रांतून हिंदुविरोधकांचा चांगलाच समाचार घेऊन निवेदकांसह हिंदुविरोधकांची बोलती बंद केली आहे. ‘हिंदुविरोधकांचा वैचारिक प्रतिवाद’ ही आज काळाची आवश्यकता असतांना राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील अनेक सूत्रांचे ते त्यांच्या व्याखानातूनही क्षात्रवृत्तीने खंडण करत असल्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म कार्यही होत आहे. प्रखर राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान अंतरात असल्यामुळेच त्यांना हे शक्य होत आहे. हिंदुत्वनिष्ठांनाही पुराव्यांसह सोदाहरण समोरच्याला आकलन होईल अशा भाषेत ते वैचारिक प्रतिवाद करत असल्याने समोरचा दुखावलाही जात नाही आणि हिंदुत्वाचे सूत्रही समाजापर्यंत पोचते, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
हिंदुत्वनिष्ठ साहित्यिक !
‘विपुल लेखन करूनही हिंदुत्वनिष्ठांना मराठी साहित्यविश्वात स्थान दिले जात नाही’, या सूत्राला डॉ. शेवडे यांनी वाचा फोडली आहे आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने या सूत्राविषयी लढा दिला आहे. प्रखर धर्माभिमान आणि तत्त्वनिष्ठा असल्यामुळेच तथाकथित बुद्धीवादी आणि पुरोगामी साहित्यिकांच्या विश्वात हे सूत्र त्यांनी मांडले अन् त्यामुळे साहित्यक्षेत्रात हिंदुत्वनिष्ठ विचारांना तुच्छतेने पहाण्याच्या भूमिकेला कुठेतरी निश्चितच वाचा फुटली. ‘स्वातंत्र्यवीर साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद प्राप्त होण्याचा बहुमान त्यांना मिळणे, हे अतिशय योग्यच होते.
धर्मनिष्ठ परंपरा !
स्वामी वरदानंदभारती यांच्यासारखे मोठे राष्ट्रगुरु डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना गुरुस्थानी आहेत. सुप्रसिद्ध व्याख्याते भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे सुपुत्र म्हणून त्यांचा वारसा त्यांना मिळाला. आदि शंकराचार्यांचे चरित्र त्यांनी समाजासमोर ठेवून त्यांनी हिंदूंना ‘हिंदूंच्या थोर सनातन धर्मपरंपरेची ओळख करून दिली’, हे त्यांचे मोठे योगदान आहे. धर्माचे आधिष्ठान असल्याविना कुणी राष्ट्राविषयी तळमळीने बोलू शकत नाही. ते डॉ. शेवडे यांना निश्चितच आहे. आता त्यांची पुढची पिढीही त्यांच्या राष्ट्र आणि धर्म निष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत आहे, हे त्यांच्या संस्कारांचेच फलित आहे.
‘विविध माध्यमांद्वारे राष्ट्र आणि धर्म विषयक वैचारिक खंडण, प्रबोधन आणि जनजागृती यांचे कार्य ईश्वर त्यांच्याकडून असेच अखंडपणे करून घेत राहो’, हीच या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना !
– ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह
हिंदुत्वाची परखड विचारधारा मांडून डॉ. सच्चिदानंद शेवडे समाजाला योग्य दिशा देतात ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समितीप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे हे कोणत्याही विषयावर त्यांचे परखड मत मांडतात. लहान लहान उदाहरणांतून ते समाजाला योग्य दिशा देतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर ते म्हणतात, ‘‘भारताला स्वातंत्र्य ‘मिळाले’ कि त्याने ते ‘मिळवले’ ?’ ‘मिळाले’ शब्दप्रयोगातून ‘भीक मिळाल्याची भावना येते’, तर ‘मिळवले’ शब्दप्रयोगातून ‘पौरुष निर्माण होते.’ समाजामध्ये वीरता निर्माण होण्यासाठी ‘कोणता दिवस साजरा करायचा ?’ हे ते जनमानसावर ठसवतात. उदाहरणार्थ त्यांनी सांगितले, ‘‘आज राजकारणी अभ्यास न करताच ‘२६/११’चा मुंबईवरील आक्रमणाचा दिवस साजरा करतात; मात्र प्रत्यक्षात त्या दिवशी भारतावर आक्रमण झाले आणि त्यानंतर ३ दिवस पोलीस आणि सैन्य दल यांनी लढून आतंकवाद्यांवर विजय मिळवला, तो खरे तर विजय दिवस म्हणून आज साजरा केला पाहिजे !’’ एखाद्या वाहिनीवर चर्चासत्राला जाण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा होते. त्या वेळी त्यांना केवळ दूरभाष केल्यास ते त्वरित त्यांची अभ्यासपूर्ण आणि महत्त्वपूर्ण सूत्रे सांगतात. त्यामुळे हिंदुत्वाची बाजू मांडण्यासाठी त्यांचे साहाय्य होते. तसेच एखादा नवीन विषय असल्यास ते स्वतः दूरभाष करून त्या विषयाची माहिती करून घेतात. शेवडे परिवाराच्या ३ पिढ्या हिंदु समाजाचे प्रबोधन आणि जागृती करत आहेत. हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. डॉ. शेवडे यांची आज षष्ठ्यब्दीपूर्ती आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, त्यांनी शतायुषी व्हावे आणि हिंदु समाजाला त्यांचे मार्गदर्शन मिळत रहावे ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती |