बातमीमूल्य ?

सौजन्य : ABP माझा

अभिनेते सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरात घुसून एका चोराने आक्रमण केले आणि त्यामध्ये ते घायाळ झाले. त्यांना तात्काळ रिक्शातून रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर शस्त्रकर्म करण्यात आले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर आक्रमण होणे म्हणजे सर्वांच्याच दृष्टीने त्याला बातमीमूल्य आहे, हे नक्की; परंतु यामध्ये एका वृत्तवाहिनीने या घटनेतील रिक्शाचालकाची मुलाखत ‘एक्सक्ल्युझिव्ह न्यूज’ (विशेष बातमी) या मथळ्याखाली प्रसारित केली. यातून ‘सैफ अली खान यांच्यावरील आक्रमणाच्या बातमीतील कोणकोणत्या गोष्टींना बातमीमूल्याच्या दृष्टीने किती महत्त्व द्यायला हवे ?, याचे तारतम्य वृत्तवाहिन्यांना आहे कि नाही ?’, असा प्रश्न पडला. अशा प्रकारच्या वृत्तांतून ‘वृत्तवाहिन्यांना त्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी काय प्रसारित करायला हवे, याचे भान नाही’, हेच लक्षात येते. ‘केवळ ‘टी.आर्.पी.’च्याच मागे लागणे एवढेच त्यांचे ध्येय आहे का ?’, असा प्रश्न पडतो.

वृत्तवाहिनीवर ‘एक्सक्ल्युझिव्ह न्यूज’ म्हणून एखादे वृत्त चालू होते, तेव्हा सर्वांनाच ‘यामध्ये काहीतरी भयंकर घडलेले आहे आणि आपण आपले काम सोडून काय झाले आहे, ते पहायला हवे’, असेच वाटते. अभिनेते सैफ अली खान घायाळ झाल्यानंतर त्यांना भजनसिंग नावाच्या रिक्शाचालकाने रुग्णालयात पोचवले. ‘त्यांची मुलाखत दाखवतांना त्यांना विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरे यातून सध्याच्या वृत्तवाहिन्या आपल्या कर्तव्यापासून किती लांब गेल्या आहेत’, हेच लक्षात येते. वृत्तवाहिनीवर ‘सैफला वाचवणारा देवदूत …वाहिनीवर’ असा मथळा दाखवण्यात आला. त्यांना प्रश्न विचारतांना ही घटना किती वाजताची आहे ? तुम्ही कुठून कुठे जात होता ? तुम्हाला कुणी बोलावले ? तुम्हाला ‘सैफ अली खान रिक्शामध्ये आहे’, हे कधी समजले ? त्यांनी काय पोषाख परिधान केला होता ? रिक्शामध्ये सैफ कुठे बसले होते ? त्यांच्यासमवेत कोण कोण होते ? सोबत असणारे घाबरलेले होते का ? तुम्हाला ‘लवकर लवकर रिक्शा चालवा’ असे म्हणत होते का ? इत्यादी असे अनेक प्रश्न ! महत्त्वाचे म्हणजे यातील काही प्रश्न तीन-तीन वेळा विचारले, हे अजूनच गंभीर !

यामध्ये या रिक्शाचालकाला शोधणे, त्याची मुलाखत घेऊन ती प्रसारित करणे यामध्ये गेलेला वेळ पहाता राज्यामध्ये जणू काही अघटित घडतच नाही. सर्व काही चांगले चालू आहे, ही एकच मोठी बातमी आहे, अशा अविर्भावात ही मुलाखत प्रसारित होत होती. स्त्रियांवरील अत्याचार, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या अनेक समस्या ‘आ’वासून उभ्या असतांना अशा बातम्या दाखवण्यात वेळ घालवलेला पाहून मनामध्ये एकच प्रश्न येतो ‘याचे बातमी मूल्य काय ?’

– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.