बांगलादेशमध्ये गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्के घट !

कथित धर्मनिरपेक्ष असणार्‍या सत्ताधारी अवामी लीगच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

गेल्या ४ दशकांत याकडे लक्ष न देणार्‍या भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! आता तरी सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार का ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – गेल्या ४० वर्षांत बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांनी घटून ती आता ८.५ टक्के इतकी राहिली आहे. बांगलादेशी हिंदू मोठ्या संख्येने भारतात पलायन येत आहेत. पंतप्रधान शेख हसीना स्वत:ची ओळख ‘धर्मनिरपेक्ष’ अशी सांगून हिंदूंना संरक्षण देण्याचे आश्‍वासन देत आल्या आहेत; परंतु सध्याच्या हिंदूंवरील आक्रमणांच्या घटना रोखण्यास त्याना यश आलेले नाही. पारंपरिक हिंदु मतदार हा बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगचा पूर्वीपासून समर्थक आहे. असे असले, तरी अवामी लीग वर्ष २००९ पासून सत्तेत असूनही हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.

सामाजिक माध्यमांतून इस्लामविरोधी पोस्ट करून त्याचे खापर हिंदूंवर फोडून आक्रमणे करण्याचे षड्यंत्र !

बांगलादेशातील गणसमिती आंदोलनाचे जुनैद साकी म्हणाले की, सत्ताधारी अवामी लीग पक्ष अल्पसंख्यांकांना, त्यातही हिंदूंना संरक्षण देण्याच्या गप्पा मारतो; परंतु प्रत्यक्षात देशात तसे चित्र दिसत नाही. हिंदूंवर आक्रमण करण्याची विशिष्ट पद्धत दिसून येते. सामाजिक माध्यमांवर काही साहित्य प्रसारित केले जाऊन त्याला इस्लामच्या विरोधात असल्याचे ठरवले जाते. त्यानंतर कट्टरतावादी गट हिंदूंवर आक्रमण करण्याचा आदेश देतात आणि त्यानंतर आक्रमणे केली जातात. ही गोष्ट आता अल्पसंख्यांक हिंदु समुदायालाही आता लक्षात आली आहे. राजकीय पातळीवर हिंदूंची उपेक्षा होते.

गुन्हा नोंदवल्यानंतरही कारवाई होत नाही !

‘बांगलादेश हिंदु, बुद्धिस्ट, ख्रिश्‍चन युनिटी कौन्सिल’ या बांगलादेशी अल्पसंख्यांक संघटनेचे राणा दासगुप्ता म्हणाले की, पलायनामुळे हिंदूंची संख्या अल्प होत आहे. मागील सरकारच्या काळात हिंदूंवरील आक्रमणांनंतर गुन्हे नोंद होत नव्हते. सरकारकडून गुन्हा नोंदवण्याचा केवळ आदेश दिला जायचा. आता अवामी लीगच्या सरकारच्या काळात दोषींविरुद्ध गुन्हे नोंद होत आहेत; परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही.