पाकमध्ये हिंदू तरुणाचे धर्मांतर करून अपहरण !

कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठीही दबाव

पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी भारत सरकार कधी पुढाकार घेणार ? – संपादक

चंदोर किट्ची

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील तंदो अल्लायार या जिल्ह्यात नुकतेच चंदोर किट्ची उपाख्य चंदू या ३२ वर्षीय हिंदु तरुणाचे त्याचा शेजारी रहाणारा आझम काश्मिरी याने बलपूर्वक अपहरण करून धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. याविषयी चंदू याने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. यामुळे तरुणाच्या वडिलांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

१. सिंध प्रांतातील गरीब हिंदूंना साहाय्य करणार्‍या ‘पाकिस्तान ड्रॉअर असोसिएशन’ नावाच्या एका संस्थेने हे प्रकरण समोर आणले आहे. संस्थेचे अध्यक्ष फकीर शिवा यांनी सांगितले की, चंदूचे भ्रमणभाषचे दुकान आहे. जवळच आझम काश्मिरी याचेही दुकान आहे. चंदू तेथे नेहमी जात होता. आझम त्याला बदीन शहरातील एका मौलानाकडे घेऊन गेला. तेथे चंदूचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर आझमने तिघांच्या साहाय्याने चंदूचे अपहरण केले. ‘आता पत्नी आणि मुले यांना बोलावून त्यांचाही धर्म पालट’, असे त्याला सांगण्यात आले. चंदूला ते मान्य नव्हते. शेवटी चंदूने तेथून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात पोचला. पोलिसांनी गुन्हा नोंद न केल्याने चंदूचे वडील आबो किट्ची यांनी काही संस्थांकडे साहाय्य मागितले. नंतर आबो यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. आबो यांनी सरन्यायाधीश आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. ‘आम्हाला प्रतिदिन आझम आणि त्याचे सहकारी यांच्याकडून धमक्या मिळत आहेत’, असे त्यांनी सांगितले.

२. पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे हिंदु खासदार लालचंद माळी म्हणाले की, या घटनेमागे काही धर्मांध लोक आहेत. मी स्वत: या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे. चंदूच्या कुटुंबाला संरक्षण दिले जाईल.