महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोत खुले करण्याची मागणी मान्य केली नाही ! – नरेश दहीबावकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

कृत्रिम तलावाच्या संदर्भातील असुविधांचा अहवाल पालिकेला देणार !

मुंबई – गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोत खुले करण्याची मागणी करूनही महापालिकेने आमची ही मागणी मान्य केली नाही. मागील वर्षी अनेक विसर्जनस्थळांवर दुरवस्था होती. काही ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे संतप्त भाविकांनी समितीकडे तक्रार करत कृत्रिम तलावाला विरोध दर्शवला होता. या तक्रारींची नोंद घेऊन या वर्षी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनासाठी समितीने पालिकेशी समन्वय साधला; परंतु त्यापूर्वीच पालिकेने कृत्रिम तलावांची सिद्धता केली. नैसर्गिक जलस्रोतांची मागणी या वर्षी पूर्ण झाली नाही.

मागील वर्षी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव उभारले; परंतु काही तलावांवर दिवे नसणे, विसर्जनासाठी मनुष्यबळ नसणे, तात्पुरते विसर्जन करून मूर्ती बाजूला काढून ठेवणे असे प्रकार भाविकांनी पाहिल्याने मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. हे पालिकेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी भाविक आणि गणेशोत्सव मंडळे यांनी समन्वय समितीकडे तक्रारी केल्या होत्या. म्हणून समितीने महापालिकेकडे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याची मागणी केली होती.

कृत्रिम तलावाच्या संदर्भातील ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही !

गतवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले आहेत. कृत्रिम तलावांच्या ठिकाणचे नियोजन, व्यवस्था, विसर्जनाची पद्धत यांकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांचा अहवाल सिद्ध करून पालिकेला सादर करणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली. ‘कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ढिसाळ कारभारही चालवून घेतला जाणार नाही. पालिकेच्या कंत्राटदाराने गणेशमूर्ती या व्यवस्थित आणि भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने विसर्जन करायला हव्यात. म्हणून या वर्षी विसर्जन अहवाल पालिकेला देणार आहे’, असे त्यांनी सांगितले.

कृत्रिम तलावांचे कंत्राट गणेशोत्सव मंडळांना द्यावे !

विसर्जनाचे कार्य गणेशोत्सव मंडळे उत्तमरीत्या पार पाडू शकतात; शिवाय त्यांना अर्थसाहाय्यही होईल, या दृष्टीने कृत्रिम तलावांचे कंत्राट पुढच्या वर्षी मंडळांना द्यावे, अशीही मागणी केली आहे, असे दहीबावकर यांनी सांगितले.