मानाच्या पाचही गणपतींचे यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन  !

सार्वजनिक गणेशात्सव

पुणे, १९ सप्टेंबर (वार्ता) – कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड भागात गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणपति विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी असून विसर्जन घाट बंद केले आहेत. ‘प्रशासनाने घरगुती गणेशमूर्ती घरीच विसर्जन करा किंवा संकलन केंद्रावर द्या’, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेशमूर्तीही जागेवरच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. आज अनंतचतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील मानाचे ५ ही गणेशमूर्तींचे विसर्जन मंडपासमोरच अगदी साधेपणाने करण्यात आले.
१. मानाचा पहिला गणपति ग्रामदैवत कसबा गणपतीचे विसर्जन सकाळी ११.३० वाजता सनई  चौघड्यांच्या वादनात मांडवातील हौदात करण्यात आले.
२. मानाचा दुसरा गणपति ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी याचे विसर्जन सकाळी ११.३२ वाजता सनई  चौघड्याच्या वादनात मांडवातील हौदात करण्यात आले.
३. मानाचा तिसरा गणपति गुरुजी तालीम याचे विसर्जन दुपारी १२.३० वाजता मांडवातील हौदात  करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार ढोल वाजवून आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
४. मानाचा चौथा गणपति तुळशीबाग गणपतीचे दुपारी १.३० वाजता हौदात विसर्जन करण्यात आले. या वेळी फुलांच्या पाकळ्यांची उधळण, ढोलताशा वादन करत पालखीतून मिरवणूक काढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्या वेळी थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु नंतर पदाधिकारी आणि पोलीस यांनी चर्चा केल्याने विसर्जन शांततेत झाले.
५. मानाचा पाचवा गणपति केसरीवाडा याचे दुपारी १.२४ वाजता सनई चौघड्यांच्या वादनात कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.