राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण व्हा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील धर्मप्रेमींसाठी आयोजित करण्यात आले शौर्यजागृती अभियान !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देहली – येणार्‍या काळात जेव्हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यांच्या विरोधात भारताला युद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा साम्यवादी, तथाकथित धर्मनिरपेक्ष, चीन-अफगाणिस्तान समर्थक यांच्यापासून देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी पोलीस, प्रशासन अन् सैनिक यांना सहकार्य करावे लागेल. त्यासाठी आतापासूनच साधनेला आरंभ करा. धर्मशिक्षण घेऊन धर्माचे पालन करत त्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पोलीस, प्रशासन आणि सैनिक यांना साहाय्य करत राष्ट्राचे रक्षण करण्यासह स्वतःचे रक्षण करायचे आहे. त्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन केवळ शारीरिक नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण व्हायचे आहे. मनोबल, आत्मबल वाढवून धर्मसंस्थापनेचे कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान’ घेण्यात आले होते. यानंतर पुढील ८ दिवस धर्मप्रेमींसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात आला. या वर्गाच्या सांगतेच्या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे देहली आणि हरियाणा राज्यांचे समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी केले.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वपूर्ण सूत्रे

१. महाभारताच्या वेळी कौरवांचे संख्याबळ अन् बाहुबल अधिक असूनही धर्माचरण, साधना आणि गुरूंचे मार्गदर्शन यांमुळेच पांडवांचा विजय झाला. धर्माचरण, साधना आणि गुरूंचे मार्गदर्शन नसल्यावर जीवनात निराशा, मनोबल आणि आत्मबल यांचा अभाव दिसून येतो. अशा वेळी बाहुबल आणि संख्याबल भारी पडते अन् पराजय होतो; परंतु पांडवांप्रमाणे आपले संख्याबळ, बाहुबल अल्प असले, तरीही धर्म, ईश्वर आणि गुरु यांच्यावर श्रद्धा असेल, तर आपले आत्मबल अन् मनोबल निश्चितच वाढेल.

२. प्रभु श्रीरामाचा जन्म नवमीला, श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला, तर हनुमानाचा जन्म पौर्णिमेला झाला, मग आपण स्वतःच्या जन्माची तिथी न सांगता दिनांक का सांगतो ? यासाठी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. धर्माचरण करून धर्मरक्षण करायचे आहे.

३. हिंदु संस्कृती त्यागावर आधारलेली आहे. प्रभु श्रीरामाने लंकेवर विजय प्राप्त करूनही बिभीषणाला राज्य दिले, महाराणा प्रताप जंगलात राहिले. या दिव्य विभूतींच्या त्यागाचा आदर्श घेतला, तर परिवारातील मतभेद, वडिलधार्‍यांचा अनादर आदी घडणार नाहीत. स्वतःचे दोष आणि अहंकार यांचा त्याग करावा लागणार आहे. त्यागानेच अमरत्वाची प्राप्ती होते.

४. जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा धर्मकार्य करण्याचीच आवश्यकता असते. ‘माझ्याकडे वेळ नाही,’ असे म्हटल्यास धर्माचे रक्षण कोण करणार ? जर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप ऐश्वर्य भोगण्यासाठी मोगलांना शरण गेले असते, तर आज आपण स्वत:ला ‘हिंदु’ म्हणवून घेऊ शकलो असतो का ? अशा राजांचा आदर्श घेऊनच स्वरक्षण शिकण्यासाठी आणि स्वरक्षण अभियानाला मित्र, कुटुंबीय यांना जोडण्यासाठी वेळेचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.

५. प्रभु श्रीराम एका बाणाने समुद्र दुभंगून लंकेत जाऊ शकले असते; परंतु वानरांचा त्याग व्हावा, सेवाभाव निर्माण व्हावा, यासाठी रामसेतू निर्माण करून त्यांचा उद्धार केला. वानरांप्रमाणे आपले धर्म आणि राष्ट्र यांसाठी समर्पण व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे किंवा महाराणा प्रताप यांच्या सैनिकांची तन, मन, धन आणि प्राण यांचा त्याग करण्याची सिद्धता होती. त्याप्रमाणे ‘माझे मन, बुद्धी आणि शरीर राष्ट्रकार्यासाठी समर्पित व्हावे’, या दिशेने प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

६. धर्मशिक्षण घेणे, धर्मप्रसार करणे, हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित करणे आणि हिंदु राष्ट्राचा विषय मनामनांत पोचवून भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी घटनात्मक पद्धतीने घोषित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाज, शासनकर्ते, प्रशासन यांच्या मनात हिंदु राष्ट्राचे बीज लावून सत्त्वगुणी समाजव्यवस्था निर्माण करायची आहे. त्यासाठी सत्त्वगुणी शासनकर्ते आणून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी अभियान चालवावे लागेल.

तुम्ही माझे धर्मबंधु आहात ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

मार्गदर्शनाच्या प्रारंभी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी कार्यक्रमात सहभागी धर्मप्रेमींचा ‘धर्मबंधु’ म्हणून उल्लेख केला. याविषयी ते म्हणाले, ‘‘जी व्यक्ती सनातन धर्माप्रती श्रद्धा ठेवते, धर्मानुसार आचरण आणि त्याचे रक्षण करू इच्छिते, ती माझी धर्मबंधु आहे. त्या व्यक्तीसमवेत माझे रक्ताहूनही मोठे धर्माचे नाते आहे. त्यामुळे तुम्ही माझे धर्मबंधु आहात.’’