सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस
पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक
१. पैशासाठी प्रामाणिक कर्मचार्यांना त्रास देणारे पोलीस अधिकारी !
‘एका तालुक्याच्या पोलीस ठाण्यात असतांना पोलीस निरीक्षकांनी मला कार्यालयीन कामकाज पहायला सांगितले आणि चौकीचा कार्यभारही सोपवला होता. या चौकीच्या अंतर्गत येणारी सर्व गावे पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेली होती. चौकीचा कार्यभार सोपवणार्या अधिकार्याचे दुसर्या ठिकाणी स्थानांतर झाले होते. त्यांच्या जागेवर आलेले पोलीस ठाणेदार पुष्कळ भ्रष्टाचारी होते. त्यांना माझ्याकडून काहीच आर्थिक लाभ होत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.
१ अ. एका प्रकारामुळे लोक भयभीत झालेल्या गावात पोलीस कर्मचार्याला बंदोबस्तासाठी देणे; पण दिवसरात्र काम करावे लागल्याने आजारी पडणे : एकदा परिसरातील काही गावांमध्ये घरांवर अचानक दगड पडायचे; पण ते माणसांना लागत नव्हते. (याला गावातील लोक ‘भानामती’ म्हणतात.) त्यामुळे गावातील लोक भयभीत झाले होते. अधिकार्याने या ठिकाणी बंदोबस्तासाठी माझीच नेमणूक केली. त्यामुळे मला रात्री गस्त आणि दिवसा कार्यालयीन काम करावे लागायचे. अर्थात्च सततच्या शारीरिक ताणामुळे २-३ मासांनी मी पुष्कळ आजारी पडलो.
२. सरळमार्गी पोलीस कर्मचार्याच्या अन्वेषणामध्ये भ्रष्ट कर्मचार्यांनी अडथळा निर्माण करून त्रास देणे आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करून गेल्यावर वरिष्ठांनी काहीही न विचारणे
वर्ष १९९६ ते २००४ या कालावधीत मी अन्य एका गावाच्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होतो. त्या वेळी मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असल्याने अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हायचो. त्यामुळे मला बरेचसे लोक ओळखत होते. कालांतराने वर्ष २०१० मध्ये माझे पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात पुन्हा स्थानांतर झाले. त्या वेळी अन्य भ्रष्ट कर्मचार्यांचे पंटर (पोलीस आणि पक्षकार यांच्यात आर्थिक समन्वय ठेवणारी व्यक्ती) मला ओळखत होते. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात येण्याचे बंद झाले. त्यामुळे अन्य कर्मचार्यांची हानी होऊ लागली. त्यानंतर ते कर्मचारी माझ्याविषयी अधिकार्यांना खोटे-नाटे सांगून मला त्रास देऊ लागले. एकदा माझ्याकडे दुखापतीचे प्रकरण अन्वेषणाला देण्यात आले. अन्वेषण चालू असतांना एका कर्मचार्याने त्या गुन्ह्यातील फिर्यादी पक्षाला खोटा सल्ला दिला आणि माझ्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करायला लावली. वरिष्ठांनी मला अन्वेषणाची कागदपत्रे घेऊन उपस्थित रहाण्याचा आदेश दिला. मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करून संबंधित कागदपत्रे घेऊन वरिष्ठांसमोर उपस्थित झालो. त्यांनी कागदपत्रे पाहिली आणि मला काहीही न विचारता परत जाण्यास सांगितले. त्या वेळी माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३. वरिष्ठांना प्रत्युत्तर दिल्याने त्यांनी लगेचच दुसरीकडे स्थानांतर करणे
एका ठिकाणी पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या कर्मचार्यांसह बाजारपेठेतील एका किराणा मालाच्या दुकानाची साठा तक्त्याची पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी दुकानदाराकडून पैसे घेतले. त्यामुळे त्याला पोलीस वाहनातून न नेता (दुकानदाराची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून) मला दुकानदाराच्या समवेत त्याच्या वाहनाने येण्यास सांगितले. अधिकार्याला पैसे दिल्यामुळे तो दुकानदार लगेच न निघता अंधार झाल्यावर निघाला. वाटेत म्हशी आडव्या आल्याने आमच्या वाहनाला अपघात झाला. त्याच स्थितीत आम्ही शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार केले आणि पोलीस ठाण्यात गेलो. पोलीस निरीक्षक आरोपीसमोरच माझ्यावर ओरडले. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही दुकानदाराला वाहनातून घेऊन आला असता, तर हे पुढचे संकट टळले असते.’’ याचा राग धरून त्यांनी मला नको असलेल्या ठिकाणी माझे स्थानांतर केले.’
– एक माजी पोलीस अधिकारी
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा ! पोलीस-प्रशासन यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधितांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४ ई-मेल : [email protected] |