रायगड जिल्ह्यातील तळीये (महाड) येथे २१ जुलै या दिवशी दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका डॉ. कविता राणे या घटनास्थळी वार्तांकनासाठी गेल्या होत्या. तेथे गेल्यावर त्यांना आलेले हृदयद्रावक अनुभव आणि घटनेची लक्षात आलेली विदारकता पुढील लेखाद्वारे त्यांनी मांडली आहे. यावरूनच कोणत्याही स्वरूपाचा आपत्काळ किती भयावह असतो, याची कल्पना येते.
१. तळीये येथे जातांना आलेले अनेक अडथळे
२१ जुलै या दिवशी तळीये येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. २२ जुलै या दिवशी दुपारी कार्यालयीन प्रमुखांच्या सांगण्यानुसार मी, ध्वनीचित्रीकरण करणारे अरविंद आणि वाहनचालक यांच्या समवेत घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. रात्री ९.४५ वाजता आम्ही माणगावला पोचलो; पण पुढे महाडमध्ये वीज नसल्याचे समजल्यावर माणगाव येथे थांबण्याचा निर्णय घेतला. दुसर्या दिवशी २३ जुलै या दिवशी सकाळी ५.३० वाजता महाडच्या दिशेने निघालो. तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणार्या घरांच्या भिंतींवर किमान ९ – १० फूट पाणी आल्याच्या खुणा दिसत होत्या. अनेक ट्रक आणि वाहने उलटसुलट पडलेली होती.
२. दरड कोसळलेल्या ठिकाणी २०० ते ३०० मीटर अंतर चढून जावे लागणे आणि तेथे सर्वत्र चिखल दिसणे
सकाळी ७ वाजता आम्ही तळीये येथे पोचलो. गाडीपासून दरड कोसळलेल्या जागेपर्यंत जाण्यासाठी २०० ते ३०० मीटर अंतर चढून जावे लागणार होते. तेथे गेल्यावर वस्ती असल्याची कोणतीही खूण दिसत नव्हती. सर्वत्र चिखल दिसत होता.
३. साहाय्यकार्य करणार्या जवानाचाच पाय मांडीपर्यंत चिखलात रुतणे आणि ‘नेटवर्क’अभावी संपर्कात अडचणी येणे
तळीयेची घटना होऊन ३५ घंटे होऊन गेले, तरी साहाय्यकार्याला आरंभ करण्यात आलेला नव्हता. सकाळी ८ वाजता ठाणे येथील आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ जवानांनी तेथे साहाय्यकार्य चालू केले. एका जवानाचा पाय थेट मांडीपर्यंत आत चिखलात रूतला. जेसीबी (माती काढण्यासाठीचे यंत्र) उपलब्ध नसल्याने कुणीही जवानांना रस्ता मोकळा करून देऊ शकत नव्हते. ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे (राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे) पथक सकाळी ९ वाजता पोचले. केवळ जिओ आस्थापनाचे तुटक तुटक ‘नेटवर्क’ मिळत होते. त्यामुळे संपर्कातही अडचणी येत होत्या.
४. दुर्घटनेला ४२ घंटे होऊनही एकच मृतदेह सापडल्याने प्रशासनाच्या निष्क्रीयतेविषयी नातेवाईक संतप्त होणे
काही वेळाने ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह जवानांना मिळाला. तो पाहून त्याचे वडील विजय पांडे यांनी आक्रोश केला. नंतर समजले की, विजय पांडे यांचे आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी सगळेच दरडीखाली सापडले होते. इतक्या वेळात केवळ एकच मृतदेह सापडल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. ४२ घंटे होऊनही प्रशासन निष्क्रीय असल्याचे त्यांचे म्हणणे होते. २३ जुलै या दिवशी दुपारी १२ वाजता जेसीबी पोचला.
४ अ. सरकार साहाय्य करत नसल्याविषयी एका युवकाने संताप व्यक्त करणे : इतक्यात हिमाचल प्रदेशमध्ये ‘इंजिनीयरिंग सेक्शन’मध्ये कामाला असणारा अक्षय कोंढाळकर हा युवक मला भेटला. तो म्हणाला, ‘‘इथे कुणी आमदार-खासदार येणार असते, तर हेलिकॉप्टरही आले असते; पण साधा जेसीबी वेळेत आला नाही. सरकार साहाय्य का करत नाही ?’’
५. नेत्यांच्या पायांना चिखल लागू नये यासाठी प्रशासनाने केलेले आटोकाट प्रयत्न आणि यातून दिसून येणारी असंवेदनशीलता !
घटनेच्या तिसर्या दिवसापासून नेत्यांचे दौरे चालू झाले. बहुतेक सगळे मोठे नेते हेलिकॉप्टरने महाड औद्योगिक वसाहतीपर्यंत येऊन नंतर तेथून गाडीत बसून तळीयेपर्यंत यायचे. नेत्यांच्या गाड्या येण्याची वेळ झाल्यावर पोलीस सगळ्यांना बाजूला हटवायचे आणि घटनास्थळाच्या सगळ्यात जवळ जेथपर्यंत गाड्या जाऊ शकतात, तेथपर्यंत पोलीस रस्ता मोकळा करून द्यायचे. गाडीतून उतरल्यावर अधिकारी माहिती देत नेत्यांच्या पायापुरताच केवळ चिखल लागेल इतक्याच अंतरापर्यंत त्यांना न्यायचे आणि तेथून सर्व नेते माघारी फिरायचे. प्रत्यक्ष साहाय्यकार्यापासून हे नेते बरेच दूर असायचे. शुभ्र कडक इस्त्रीचे कपडे, अत्यंत महागडे चकचकीत पॉलीश केलेले बूट आणि कुणाचाही स्पर्श नेत्यांना होणार नाही, याची काळजी घेत त्यांच्यासाठी कडे करून उभे रहाणारे पोलीस अन् सुरक्षारक्षक असा लवाजमा असायचा. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना तर थेट जाडजूड दोरीचे कुंपण घालून नेण्यात आले. गाडीतून उतरून पहाणी करायला जाण्यास दोन मिनिटे, प्रत्यक्ष घटनास्थळी दोन मिनिटे, प्रसारमाध्यमांशी बोलायला दोन मिनिटे, लोकांशी बोलायला दोन मिनिटे आणि गाडीचा दरवाजा उघडून अर्धवट आत अन् अर्धवट बाहेर अशा अवस्थेत अधिकार्यांना सूचना द्यायला दोन मिनिटे असा प्रत्येक नेत्याचा कार्यक्रम होता. १० ते १२ मिनिटांपेक्षा अधिक वेळ एकही नेता घटनास्थळी थांबला नाही.
६. जवानांना अनेकदा मृतदेहाच्या अवयवांचे तुकडे सापडणे आणि जेसीबीचे तोंड एका मृतदेहाला लागल्यावर त्याची झालेली अवस्था पाहून जेसीबी चालकाला उलटी होणे
घटनेच्या चौथ्या दिवशी म्हणजे २४ जुलै या दिवशीही शोधकार्य चालू होते. ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे जवान वासाच्या आधारे मृत व्यक्तींना शोधायचे. जिथे वास यायचा, तिथे ते खणायचे. अनेक वेळा तेथे गाय, म्हैस, कुत्रा यांची प्रेते सापडायची. काही काही वेळा अवयवांचे तुकडे सापडत होते. संपूर्ण वातावरणात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. मृतदेह कुजायला लागले होते. काही फूट खोल खणल्यावर एखाद्या व्यक्तीचा मृतदेह सापडायचा. डोंगरावरून येणार्या पाण्यामुळे काही सेकंदात खड्डा भरायचा. त्यामुळे मृतदेह ओढून काढावा लागायचा; पण त्यात त्यांचे अवयवच हाती यायचे. जेसीबीच्या चालकाने एका ठिकाणी जेसीबीचे तोंड मातीत घुसवले; पण ते एका मृतदेहाला लागले. त्यामुळे मृतदेहाची झालेली अवस्था पाहून जेसीबीच्या चालकाला उलटीच झाली.
७. २६ जुलै या दिवशी तेथे अनेक लोक येत होते; पण बर्याच जणांना केवळ ‘सेल्फी’ काढायचे होते. ते पाहून संताप येत होता.
८. तळीये गावात स्मशान शांतता जाणवणे
या मातीतून कुणीतरी जिवंत बाहेर येईल, आपल्या लाडक्यांचे शेवटचे दर्शन होईल, असे वाटणार्या सगळ्या नातेवाइकांच्या आशा-अपेक्षांना पूर्णविराम मिळाला. ३२ जीव त्या ढिगार्यात कायमचे विसावले होते. शेवटी तेथून निघतांना मागे वळून पाहिल्यावर भयानक शांतता (स्मशान शांतता) जाणवत होती.
– डॉ. कविता राणे, वृत्तनिवेदिका, ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनी
(साभार : ‘दिव्य मराठी’ संकेतस्थळ)