भारतात तालिबान्यांना विरोध होत असतांना काँग्रेसवाल्यांनी हिंदुत्वनिष्ठांनाच ‘तालिबानी’ संबोधण्यास आरंभ केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांनी ‘तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखेच आहेत’ असे विधान केले आहे. हिंदुत्वनिष्ठांनी तालिबान्यांना विरोध केल्यावर हिंदूंनाच ‘तालिबानी’ म्हणून संबोधण्याची ‘फॅशन’ सध्या प्रचलित झाली आहे. ‘तालिबानी वाईट असतीलही; मात्र तुम्हीही वाईट आहात’ अशा प्रकारचा वैचारिक आघात करण्याचा प्रयत्न हिंदुद्वेष्ट्यांकडून होऊ लागला आहे. ध्रुवनारायण यांच्या विधानातून हे स्पष्ट होते. ‘अफगाणिस्तानवर तालिबान्यांचे नियंत्रण आहे; मात्र भारतातील स्थिती त्याहून वेगळी नाही. भारतात ‘हिंदु तालिबानी राज्य करत आहेत’, असा दुष्प्रचार हिंदुद्वेष्ट्यांकडून केला जात आहे. तालिबान्यांकडून तेथील सामान्य आणि महिला यांवर अत्याचार केला जात आहेत. तेथे मानवाधिकार अस्तित्वात नाही.
तालिबानी आतंकवादी हे क्रौर्य, अत्याचार आणि अन्याय यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या हिंसक कारवाया सर्वज्ञात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची तालिबान्यांशी तुलना करणे, ही बौद्धिक दिवाळखोरी आहेच; पण त्याहून अधिक ते मोठे षड्यंत्र आहे. भारतात हिंदू जागृत झाल्यामुळे त्यांच्यावर आरोप झाल्यास ते त्याला वैध मार्गाने प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. पूर्वी अन्याय झाल्यावर गप्प रहाणारे हिंदू आता जाब विचारू लागले आहेत. त्यामुळे हिंदुद्वेष्टे हे हिंदूंवर थेट आरोप करण्यास कचरतात. त्यामुळे हिंदूंचा तेजोभंग करण्यासाठी त्यांनी ‘हिंदु तालिबानी’ हा शब्दप्रयोग करण्यास आरंभ केला आहे. हे ‘तालिबानीप्रेमी’ हिंदुद्वेष्टे तालिबान्यांचा निषेध करतांना दिसत नाहीत उलट ‘तालिबानी वाईट असतील; मात्र भारतातही हिंदु तालिबानी वास्तव्य करत आहेत’, असे चित्र रंगवण्यास त्यांनी आरंभ केला आहे. ‘भारतात मानवाधिकारांचे हनन होत असून तो हिंदूंमुळे असुरक्षित बनला आहे’, असे हिंदुद्वेष्टे सांगत आहेत. भारतात परिस्थिती कशी आहे ? धर्मांधांच्या कारवायांमुळे येथे हिंदूंनाच असुरक्षित वाटत आहे. भारतात धर्मांधांकडून आरंभण्यात आलेल्या लँड जिहादमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. पूर्वी केवळ काश्मीरमध्येच हिंदूंवर अत्याचार झाल्याचे आपण ऐकत होतो. आता मात्र केवळ काश्मीरमध्येच नव्हे, तर भारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार होत असतांना आपण पहात आहोत. भारतात हिंदू बहुसंख्य असूनही येथे स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी हिंदूंना वेळोवेळी झगडावे लागते. हिंदू हे शांतपणे आणि वैध मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. असे असूनही अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी, त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंना ‘हिंसक’ दाखवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे ध्रुवनारायण यांच्यासारख्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष न करता हिंदूंनी त्याला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !