मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना २४ ऑगस्टच्या मध्यरात्री महाड येथील विशेष दंडाधिकार्यांनी १५ सहस्र जातमुचलक्यावर जामीन संमत केला. नारायण राणे यांना ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत रायगड गुन्हे शाखेत उपस्थित रहावे लागणार आहे. जामिनावर सुटका करतांना राणे यांना कागदपत्रे आणि पुरावे यांमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येणार नाही, असे दंडाधिकार्यांनी निर्देश दिले आहेत.
राणे यांची मध्यरात्री सुटका झाली, त्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. रत्नागिरी पोलिसांनी २४ ऑगस्टला दुपारी राणे यांना संगमेश्वर येथे अटक केली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांना रायगड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले होते. राणे यांच्या अटकेमुळे शिवसेना आणि भाजप यांमध्ये राज्यात ठिकठिकाणी संघर्ष पेटला असून त्याचे पडसाद अजूनही राज्यात उमटत आहेत.
२६ ऑगस्टपासून रत्नागिरी येथून नारायण राणे पुन्हा जनआशीर्वाद यात्रा चालू करतील ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
नारायण राणे आता मुंबईला जाणार आहेत. तेथे त्यांच्या प्रकृतीची पडताळी केली जाणार आहे. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते २६ ऑगस्टपासून रत्नागिरीमधून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा चालू करतील