मालकाने केलेल्या छळामुळे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप !

पालघर जिल्ह्यात आदिवासी महिलेची तक्रार धक्कादायक

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर असे प्रकार घडणे देशासाठी चिंताजनक ! – संपादक 

मुंबई – मुलाच्या अंत्यविधीनिमित्त मालकाकडून घेतलेल्या ५०० रुपयांसाठी मालकाने वेठबिगारीसाठी राबवून घेतले. यामध्ये मालकाने केलेल्या छळामुळे पतीने आत्महत्या केली, अशी तक्रार पालघर जिल्ह्यातील मोखाड पोलीस ठाण्यात एका आदिवासी महिलेने नोंदवली आहे. सावित्री पवार असे या महिलेचे नाव असून तिचे पती काळू पवार यांनी २१ जुलै २०२१ या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली.

वर्ष २०२० मध्ये सावित्री पवार यांच्या छोट्या मुलाचा मृतदेह खोल दरीत आढळला. मुलाचा मृत्यू नेमका कसा झाला ? हे त्यांना समजले नाही. मुलाच्या अंत्यविधीसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी मालक रामदास कोरडे यांच्याकडून पैसे उसने घेतले. पैसे फेडण्यासाठी काळू पवार हे रामदास कोरडे यांच्याकडे गडी म्हणून राबत होते. आत्महत्येच्या २ दिवस पूर्वी काळू पवार यांची प्रकृती ठीक नव्हती; मात्र मालकाने त्यांना मारहाण केली होती, असे सावित्री पवार यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी रामदास कोरडे हेही आदिवासी समाजाचे आहेत.