देशाच्या सीमांचे रक्षण करतांना आजपर्यंत सातारा जिल्ह्यातील सहस्रो सैनिकांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली आहे. यामध्ये १८ नोव्हेंबर २०१५ या दिवशी कर्नल संतोष महाडिक हुतात्मा झाले. या घटनेला आता ५ वर्षे होऊन गेली. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक बांधण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने वर्ष २०१५ मध्ये घोषणा करण्यात आली होती; मात्र अद्यापपर्यंत त्या स्मारकासाठी एक वीटही बसवण्यात आलेली नाही. काही दिवस जागा उपलब्ध नसल्यामुळे, तर काही दिवस विविध अनुमतींच्या कारणास्तव हे हुतात्मा स्मारक रखडले आहे.
प्रारंभी सातारा नगरपालिकेने स्मारकाविषयीचा ठराव करून त्यास संमतीही दिली; परंतु यासाठी जागेचा प्रश्न उपस्थित झाला. शहरातील यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जागा मिळवून देण्याचे आश्वासन एका नगरसेवकाने दिले; मात्र त्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पुढे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयासमोरील पालिकेच्या बागेत स्मारकाचा विचार केला गेला; मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. आता सातारा नगरपालिकेने वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे; परंतु ही घोषणाही केवळ कागदावरच राहिलेली आहे, असे चित्र आता दिसत आहे. सध्या नियोजन समितीकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रस्तावाकडे पहाण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधील सदस्यांना वेळ नाही.
यातून ‘हुतात्मा सैनिकांविषयी प्रशासनाला किती आदर आहे आणि त्यांचा आदर्श येणार्या पिढीने घ्यावा, यासाठीची तळमळ किती आहे ?’, हे लक्षात येते. प्रशासनाची उदासीनता त्यांच्यातील राष्ट्रप्रेमाचा अभावही दर्शवते, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ‘केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी देशप्रेमाचे उमाळे येणे, याला देशप्रेम म्हणता येईल का ?’ असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? विविध सेनापदके घोषित करून सैनिकांना प्रोत्साहन देता येईल; मात्र सैन्यात भरती होण्यासाठी, देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, देशप्रेमाने भारित युवकांचे सैनिकात रूपांतर होण्यासाठी हुतात्मा स्मारके उभी राहिलीच पाहिजेत. त्यामुळे देशप्रेमी नागरिकांनी संघटितपणे वैधमार्गाने सातारा नगरपालिकेला हुतात्मा स्मारकाविषयी जाब विचारला पाहिजे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा