पणजी, १९ ऑगस्ट (वार्ता.) – २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’च्या (‘इ.डी.एम्.’च्या) आयोजनासाठी अनुमती देण्याची मागणी ‘सनबर्न’चे आयोजक ‘पर्सेप्ट’ या संस्थेने गोवा शासनाकडे केली आहे; मात्र शासनाने या महोत्सवाला अजूनही अनुमती दिलेली नाही. याविषयी एका राष्ट्रीय वृत्तपत्राला अधिक माहिती देतांना ‘सनबर्न’चे आयोजक ‘पर्सेप्ट’ या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरिंदर सिंह म्हणाले, ‘‘सनबर्न’च्या आयोजनाविषयीचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे ठेवला आहे. कोरोना महामारीमुळे महोत्सवाचे आयोजन करणे अशक्य झाल्यास आम्ही स्वत:च हा महोत्सव रहित करणार असल्याचे शासनाला कळवले आहे. या महोत्सवाचे स्वरूप मोठे असल्याने याच्या पूर्वसिद्धतेसाठी महोत्सवाच्या आयोजनाची अनुमती आगाऊ मिळणे आवश्यक असते. महोत्सवातील कर्मचारी आणि कलाकार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतल्याची आम्ही निश्चिती करणार आहे, तसेच लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच आम्ही महोत्सवाच्या तिकिटाची विक्री करणार आहे.’’
वादग्रस्त ‘सनबर्न फेस्टिव्हल’मधून पाश्चात्त्य विकृतीला प्रोत्साहन मिळत आहे, समाज चंगळवादाकडे झुकून नैतिकता हरवत चालला आहे. हिंदु संस्कृती नष्ट होत आहे, तसेच या सर्व गोष्टींमुळे गोमंतकियांची अपकीर्ती होते ती वेगळीच ! गोव्यात होणार्या ‘सनबर्न’ महोत्सवाची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिलेली आहे. ‘सनबर्न’ने भलेही हा ‘ड्रग्ज-फ्री इव्हेंट आहे’, असे सांगितले असले, तरी या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनाचा मुक्त संचार असतो, असा पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांचा अनुभव आहे. वर्ष २००९ ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्ये नेहा बहुगुणा या २३ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला होता. वर्ष २०१४ मध्ये कांदोळी बीचवर झालेल्या ‘सुपरसोनिक’ या अशाच प्रकारच्या कार्यक्रमात ईशा मंत्री या युवतीचा मृत्यू झाला होता. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सनबर्न’मध्ये ३ पर्यटकांचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाला होता. ‘सनबर्न’ने यापूर्वी शासनाचा करही बुडवला आहे. गोवा ‘अमली पदार्थ’मुक्त, ‘ईडीएम्’मुक्त आणि ‘सनबर्न’मुक्त कधी होणार ? -संपादक