भ्रष्टाचार्‍यांचे राजकीय पाठिराखे शोधा !

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (‘बी.एच्.आर्.’) पतसंस्था

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (‘बी.एच्.आर्.’) पतसंस्थेची मालमत्ता हितचिंतकांना अल्प दरात देऊन आणि ठेवीदारांच्या ठेवी अल्प दरात वर्ग करून ठेवीदारांना पूर्ण रक्कम दिल्याच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या. त्यात १ सहस्र १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे. यात प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचे मानले जात आहे. एका पतसंस्थेमधील घोटाळ्याची वरील रक्कम डोळे चक्रावणारी आहे. यातून देशभरात भ्रष्टाचार किती खालच्या स्तरापर्यंत मुरलेला आहे, हेच सिद्ध होते. दर काही दिवसांनी बाहेर पडणार्‍या घोटाळ्यांची आकडेवारी मोठी आहे, हे गंभीर आहे.

या प्रकरणी मालमत्ता विक्रीविषयी सरकारी अधिकार्‍यांचे बनावट (खोटे) शिक्के सिद्ध करून तशी कागदपत्रे बनवल्याचा संशय आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर पूर्ण मोबदला न देता केवळ ३० टक्के रक्कम देऊन त्या विकत घेण्यात आल्या अन् उर्वरित ७० टक्के रकमेचा अपहार करण्यात आला. १ लाख रुपयांची ठेव असलेल्या ठेवीदारास केवळ ३० सहस्र रुपये देऊन दप्तरी १ लाख रुपये दिल्याची नोंद करण्यात आली. अशा प्रकारे अपहार करून संबंधितांनी सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा केला. गेल्या मासात कंडारे यांना इंदूर (मध्यप्रदेश) येथून, तर सुनील झंवर यांना नाशिक येथून अटक करण्यात आली. भाजपच्या एका माजी मंत्र्याचे निकटवर्तीय म्हणून झंवर यांचे नाव चर्चेत आले होते. कंडारे यांचे इंदूर येथे एका माजी मंत्र्यांच्या घरात त्यांचे वास्तव्य असल्याचे पोलिसांना समजले. नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरून झंवर यांना अटक केली असतांना तेथील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रसिद्धी माध्यमांना तशी स्पष्ट माहिती दिली नाही.

आरोपींनी माजी मंत्र्यांच्या घरात वास्तव्य करणे, यावरून झंवर आणि कंडारे यांना राजकीय पाठबळ असावे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? त्यामुळे कंडारे आणि झंवर यांना कठोर शिक्षा करण्यासमवेतच त्यांना नेमके कुणाचे राजकीय पाठबळ आहे ? याचाही पोलिसांनी शोध घ्यायला हवा, असेच सर्वसामान्यांना वाटते. घोटाळ्यांचे अन्वेषण लवकर पूर्ण न होण्यासह संबंधितांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे, हे सर्व भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखेच आहे. यामुळेच देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होत नाही, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव