‘डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांची अंनिस हे आता (महाराष्ट्रात तरी) परिचित आहेत’, असे म्हणायला कुणाची हरकत नसावी. ‘दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली’, असे म्हणण्यापेक्षा ‘अंनिसवाले आणि दाभोलकर कुटुंबीय यांनी ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाभोलकरांच्या हत्येचा चांगला लाभ उठवून घेतला’, हे म्हणणे अधिक योग्य होईल. अगदी परखडपणे सांगायचे, तर या अंनिसवाल्यांनी त्यांचे आर्थिक घोटाळ्यांनी काळवंडलेले तोंडवळे उजळवण्यासाठी दाभोलकरांच्या राखेचा वापर केला.
‘स्विस एड्’ (या संस्थेने त्यांच्या संकेतस्थळावरील भारताच्या नकाशात संपूर्ण काश्मीर पाकिस्तानात दाखवले होते.) सारख्या स्वित्झर्लंड येथील संस्थेकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेणे, ‘एफ्.सी.आर्.ए.’ कायद्याचा भंग करणे, लाखो रुपयांची मिळकत हिशोबात न दाखवणे, पन्नालाल राजपूतसारख्या रॉकेल माफियाला अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार देणे, सहकारी संस्थांमध्ये व्यक्तीगत नावाने ठेवलेल्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी संस्थेच्या हिशेबात न दाखवणे अशा अनेक घोटाळ्यांप्रकरणी त्यांच्या विरोधात धर्मादाय कार्यालयामध्ये प्रविष्ट करण्यात आलेले खटले आणि तक्रारी इत्यादींविषयी यापूर्वी अनेकदा माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या लेखात दाभोलकर आणि अंनिस यांच्या आर्थिक घोटाळ्यांची पुनरावृत्ती न करता त्यांचा बौद्धिक गोंधळ आणि हेकटपणा यांविषयी जाणून घेऊ.
१. अनुवांशिक दाभोलकरी बौद्धिक गोंधळ
काही वर्षांपूर्वी स्वत:ला पुरोगामी, बुद्धीवादी वगैरे म्हणवणे फार सोपे होते. हिंदु धर्म, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचे सण, उत्सव, व्रते, प्रथा-परंपरा यांच्यावर टीका केली, हिंदूंच्या देवतांची टवाळी केली की, लगेच स्वत:चे पुरोगामीत्व सिद्ध करता येत असे. त्यामुळे त्या काळात स्वत:ला बुद्धीवादी आणि पुरोगामी म्हणवणारे दाभोलकर कुटुंब किंवा अंनिसवाले हिंदूंच्या देवता, सण, व्रते इत्यादींवर थेट टीका करत असत. वृत्तवाहिन्यांवर होणार्या चर्चांमध्ये स्वत: नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे अनेकदा सांगून मार्क्सवादाचा जनक कार्ल मार्क्सवरील त्यांची भक्ती दाखवून दिली होती. सध्या हिंदूंमध्ये जागृती होत असल्याने ते तितकेसे सोपे राहिलेले नाही. जेव्हा हिंदूंच्या मंदिरांतील परंपरा मोडून महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यासाठीच्या आंदोलनाला अंनिसने पाठिंबा दिला, तेव्हा हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना खुले आव्हान दिले होते की, मुसलमान भगिनींनाही मशिदी आणि दर्गा यांठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी आमच्या समवेत आंदोलनाला या. तेव्हा एकेकाळी कार्ल मार्क्सचे भक्त असलेले हे अंनिसवाले म्हणू लागले की, आम्ही हिंदु असल्याने आमच्या धर्मातील अंधश्रद्धांविरोधात आधी लढणार. हिंदूंच्या विरोधात बोलतांना ‘धर्म ही अफूची गोळी’, असे म्हणणारी इस्लामचा किंवा मुसलमानांच्या परंपरांचा संबंध आला की, हे क्षणात हिंदु होतात. हा गोंधळ अनुवांशिक आहे का ?
२. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध करण्याचा दाभोलकरी हेकटपणा
‘प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध झाली, तरच ती मान्य करू. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत जी गोष्ट सिद्ध करता येणार नाही, ती मानायचीच नाही’, असा दाभोलकर कुटुंबीय आणि त्यांचे प्रवक्ते यांचा हेकटपणा असतो. या जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकलेल्या नाहीत. अगदी साधे उदाहरण द्यायचे, तर विज्ञानाने निर्माण केलेल्या उपकरणांच्या आधारे मनातील विचारांचा शरिरावर होणारा परिणाम पहाता येऊ शकतो; पण ‘मन म्हणजे नेमके काय आहे आणि ते कुठे आहे ?’, हे विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकलेले नाही. मग मनाचे अस्तित्व मानायचेच नाही का ?
३. सूर्योदय प्रयोगशाळेत सिद्ध होत नाही; म्हणून तो मानणार नाही का ?
कुठलीही गोष्ट सिद्ध करायची किंवा तिचे अस्तित्व मानायचे, तर त्यासाठी दोन पर्याय असतात. पहिला पर्याय असतो पुरावा, म्हणजे प्रयोगांती सिद्ध होणारे सत्य आणि दुसरा पर्याय असतो परिस्थितीजन्य पुरावा. असे असतांना ‘प्रत्येक गोष्ट प्रयोगांतीच सिद्ध व्हायला हवी’, हा हेकटपणा झाला. काही गोष्टींच्या अस्तित्वाविषयी आपल्याकडे पुरावा नसतो आणि तो मिळू शकत नाही, अशा वेळी परिस्थितीजन्य पुराव्यावरच अवलंबून राहून त्या गोष्टीचे अस्तित्व मानावे लागते. उदाहरण द्यायचे झाले, तर ‘उद्या सूर्य उगवणार आहे कि नाही?’, या प्रश्नाची उकल वैज्ञानिक प्रयोगशाळेत करता येणार नाही. मग ‘उद्या सूर्य उगवणार नाही’, असे म्हणणार का ? मग अशा वेळेला पुराव्याऐवजी परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घ्यावा लागतो आणि ‘गेली कोट्यवधी वर्षे प्रतिदिन सूर्य उगवत आहे, म्हणजे तो उद्याही उगवणार आहे’, हे मान्य करावे लागते. तेथे दाभोलकरी हेकटपणा चालत नाही. त्याला ‘विवेक’ म्हणता येत नाही.
४. विज्ञानाच्या किंवा मानवी बुद्धीच्या मर्यादा
विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध होणारी गोष्ट तेवढी मानायची असेल, तर अनेक गोष्टी ज्या विज्ञानाच्या प्रयोगशाळेत आजवर सिद्ध होऊ शकलेल्या नाहीत, त्या मानता येणार नाहीत, तरी त्या आपण मान्य करतोच. येथेच आपण अप्रत्यक्षपणे विज्ञानाच्या मर्यादा मान्य करतो. येथे अगदी मूलभूत गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, विज्ञानाच्या मर्यादा कोणत्या ? मानवी मेंदू किंवा बुद्धी यांच्या ज्या मर्यादा आहेत, त्याच विज्ञानाच्या मर्यादा आहेत. याचे अगदी सोपे उदाहरण देता येईल. आज विज्ञान प्रजननाविषयी सांगू शकते, म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होणे, गर्भधारणा होणे, गर्भाची वाढ होणे, नाळेवाटे गर्भाचे पोषण होणे, अपत्य जन्माला येणे या सगळ्या गोष्टी कशा होतात, हे विज्ञान आज तपशीलवार सांगू शकते. याचा अर्थ हा की, मूल कसे जन्माला येते, हे विज्ञान सांगू शकते; पण ‘मूल का जन्माला येते ?’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडे नाही. ते केवळ धर्म किंवा अध्यात्म यांच्याकडेच आहे.
५. जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिंग्टन यांचे विज्ञानाच्या क्षमतेविषयीचे मत
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिंग्टन यांना एकाने प्रश्न विचारला की, धर्म आणि अध्यात्म यांची विज्ञानाला किती माहिती असू शकते ? या प्रश्नाला उत्तर देतांना सर आर्थर एडिंग्टन म्हणाले, ‘‘समजा समुद्रातून एक प्रचंड मोठे जहाज चालले आहे आणि त्या जहाजात बटाट्यांनी भरलेली अनेक पोती आहेत. त्या पोत्यांपैकी एका पोत्यातील एका बटाट्याच्या मध्यभागी एक अळी आहे. त्या अळीला समुद्राविषयी जेवढी माहिती असू शकते, तेवढीच माहिती विज्ञानाला धर्म आणि अध्यात्म यांची असू शकते.’’ जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाचे विज्ञानाच्या मर्यादांविषयीचे हे मत आहे. अंनिसवाले दाभोलकरी हेकटपणा बाजूला ठेवून या जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाच्या मताचा अंतर्मुखतेने विचार करणार कि आर्थर एडिंग्टनला भोंदूबाबा ठरवणार ?
६. पुनर्जन्माविषयी सखोल संशोधन करून त्याला दुजोरा देणारे पाश्चात्त्य डॉ. ब्रायन वाईज यांना अंनिसवाले भोंदू ठरवणार का ?
मृत्यूनंतर, म्हणजे स्थूल शरीर नष्ट झाल्यानंतरही जिवाचे काहीतरी अस्तित्व शेष रहाते. त्याला धर्मशास्त्र ‘लिंगदेह’ म्हणते. अंनिसवाले मात्र याला थेट अंधश्रद्धा ठरवून मोकळे होतात. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध होत नाही; म्हणून ते मानायचे नाही, हा त्यांचा नेहमीचा हेकटपणा असतोच. मग ‘पुनर्जन्म किंवा लिंगदेह नसतोच’, असेही विज्ञानाच्या प्रयोगशाळेने आजवर प्रयोगांती सिद्ध करून दाखवलेले नाही. डॉ. ब्रायन वाईज या प्रथितयश व्यक्तीने ‘पुनर्जन्म’ या विषयावर ४० वर्षे मोठे संशोधन केले आहे. त्याविषयी त्याने अनेक पुस्तके लिहिली आहेत. डॉ. वाईज हे ‘अमेरिकन सोसायटी ऑफ सायकॅट्री’चे अध्यक्ष होते. माहितीजालावर (इंटरनेटवर) त्यांच्या या संशोधनाविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. यू-ट्यूबवर त्याविषयाची अनेक चलचित्रेही उपलब्ध आहेत. अमेरिकेतील एका विद्वानाने ४० वर्षांहून अधिक काळ संशोधन करून ‘पुनर्जन्म’ या संकल्पनेला दुजोरा दिला आहे. अंनिसवाले स्वत:ची झापडे काढून आणि अंतर्मुख होऊन त्याचा अभ्यास करणार कि डॉ. वाईज यांना भोंदू डॉक्टर ठरवणार ?
७. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ वर्नर हायझेनबर्ग यांना अंनिसवाले भोंदू शास्त्रज्ञ म्हणणार का ?
भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शास्त्रज्ञ वर्नर हायझेनबर्ग यांनी संशोधनांती असा निष्कर्ष काढला की, ‘विश्वातील पदार्थांचे अणूहून सूक्ष्म कण विश्वात आहेत. (धर्मशास्त्र सांगते ते सत्त्व-रज-तम) त्यांना मानवी काळाचे बंधन नाही आणि त्या कणांना मृत्यूही नाही. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्यातील चैतन्य अशाच काही कणांच्या रूपात अस्तित्वात रहात असावे, हे शक्य आहे. विज्ञानाच्या मर्यादा लक्षात आलेल्या या शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, शास्त्राच्या पेल्यातील पहिले काही घोट तुम्हाला नास्तिक बनवतील; मात्र त्या पेल्याच्या तळापर्यंत गेलात, तर तेथे परमेश्वर तुमची वाट पहात असल्याचे लक्षात येईल. अंनिसवाले या नोबेल पारितोषिक विजेत्या भौतिक शास्त्रज्ञाचे विधान गांभीर्याने घेऊन अंतर्मुख होऊन विचार करणार कि हायझेनबर्ग यांना भोंदू शास्त्रज्ञ आणि त्यांच्या नोबेल पारितोषिकाला ‘वशिल्याचा पुरस्कार’ म्हणणार ?
८. ‘मृत्यूनंतरही काहीतरी आहे आणि ते विज्ञानाच्या मर्यादेपलीकडे आहे’, हे स्वानुभवाने सांगणारे एबन अलेक्झांडर यांनाही अंनिसवाले भोंदू ठरवणार का ?
अमेरिकेतील हावर्ड विद्यापिठात शिक्षण घेतलेले न्युरोसर्जन (मज्जासंस्थेशी संबंधित तज्ञ) एबन अलेक्झांडर यांनी स्वत:च्या अनुभवाने ‘मृत्यूनंतरही काहीतरी आहे’, हे जाणले. त्याविषयी त्यांनी ‘प्रूफ ऑफ हेवन’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. पुनर्जन्म न मानणार्या या बुद्धीवादी न्युरोसर्जनने कोमामध्ये असतांना जे अनुभवले, ते त्यांना कोमातून बाहेर पडल्यानंतरही स्मरत होते. कोमात असतांना एबन अलेक्झांडर यांना माहीत नसलेली त्यांची सख्खी बहीण त्यांच्या आत्म्याला भेटली होती, जी वर्ष १९९८ मध्ये मृत्यू पावली होती. या एबन अलेक्झांडर यांची संकेतस्थळावरील मुलाखतही प्रसिद्ध आहे. एकेकाळी पुनर्जन्मावर विश्वास नसणारा हा बुद्धीवादी न्युरोसर्जन आज पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. तसेच ‘मृत्यूनंतरही एक जग आहे’, यावरही विश्वास ठेवतो.
एबन यांनी घेतलेल्या या अनुभवाला शास्त्रीय भाषेत ‘निअर डेथ एक्सपिरिअन्स’, म्हणजे ‘मृत्यूसमीप अनुभव’ म्हणतात. त्यावरही अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. विशेष म्हणजे शंभराहून अधिक रुग्णांवर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत आले आहेत की, मृत्यूसमीप अनुभव या माणसाच्या पूर्वस्मृती नसतात आणि त्याच्या कल्पनाही नसतात.
अंनिसवाले आपली झापडं काढून अशा घटनांचा प्रामाणिकपणे अभ्यास करणार कि दाभोलकरी हेकटपणाने एबन अलेक्झांडर यांनाही अंधश्रद्धाळू म्हणून वेड्यात काढणार ?
९. बुद्धीवादाचे ढोंग सोडून अंनिसवाले बुद्धीदात्याला; म्हणजे ईश्वराला समजून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार का ?
यापूर्वीच्या सूत्रात आपण पाहिले आहे की, मानवी मेंदूच्या, म्हणजे बुद्धीच्या मर्यादा याच विज्ञानाच्या मर्यादा असतात. याचा अर्थ जी गोष्ट मानवी मेंदू किंवा बुद्धी यांना कळत नाही किंवा उमजत नाही, ती गोष्ट विज्ञानालाही कळत नाही. धर्म, अध्यात्म, आत्मा या गोष्टी मानवी बुद्धीच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्यामुळे विज्ञानाच्याही आवाक्याबाहेरच्या आहेत. मग हा दोष मानवी बुद्धीचा नाही का ? एखादा आंधळा माणूस म्हणू लागला की, मला जग दिसत नाही. त्यामुळे जगच अस्तित्वात नाही, तर ते जितके हास्यास्पद असेल, तितकेच हास्यास्पद विज्ञानाला किंवा मानवी बुद्धीला सर्वश्रेष्ठ मानणे ठरेल.
त्यामुळे स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्हणवणार्यांनी मानवी बुद्धीला आणि पर्यायाने विज्ञानाला जे दिसत नाही, त्याचे अस्तित्वच नाकारण्यापेक्षा ‘हा मानवी बुद्धीचा, म्हणजेच विज्ञानाचा न्यूनपणा किंवा मर्यादा आहेत’, हे प्रामाणिकपणे मान्य करून आणि तो न्यूनपणा किंवा मर्यादा नाहीशा करून धर्म, अध्यात्म या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर खर्या अर्थाने त्यांच्या जन्माचे सार्थक होईल. अन्यथा बुद्धीच्या, म्हणजेच विज्ञानाच्या मर्यादा आणि दोष यांनाच अंतिम सत्य मानल्यास भविष्यात खरे ‘शास्त्रज्ञ’ जेव्हा विज्ञानाच्या आधारे धर्म, अध्यात्म, आत्मा यांचे अस्तित्व मान्य करतील, तेव्हा आताच्या भोंदू बुद्धीवाद्यांना मूर्ख ठरवले जाईल अन् त्यांची थट्टा केली जाईल.’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.