नंदुरबार येथील ‘समस्त हिंदुत्ववादी संघटनां’च्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन !
नंदुरबार, १८ ऑगस्ट (वार्ता.) – ज्योतिषशास्त्र हा विषय विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी काही हिंदु धर्मविरोधी संघटनांनी निवेदन दिले होते. ज्योतिषशास्त्राचा कोणताही अभ्यास न करता या संघटना सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हा विरोध करत आहेत. ‘ज्योतिष्य’ ही भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण प्राचीन विद्या आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठां’तर्गत ज्योतिषशास्त्र विषय चालू करण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य असून तो पालटू नये, अशा मागणीचे निवेदन १७ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी खांदे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की,
१. ज्योतिष हे कालज्ञानाचे म्हणजे काळाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता सांगणारे शास्त्र आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिचा स्वभाव, जन्मजात लाभलेली कला, कौशल्य, बुद्धी, व्यक्तीला पूरक कार्यक्षेत्र, जीवनाचा एकंदर दर्जा आदी अनेक गोष्टींसंदर्भात उत्तमप्रकारे बोध होतो.
२. आधुनिक विज्ञान सोडवू शकत नाही, अशा अनेक व्यक्तीगत अडचणींच्या संदर्भात ज्योतिषशास्त्र योग्य दिशादर्शन करते. समाजाला ज्योतिषशास्त्राची आवश्यकता आहे.
३. ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे, म्हणूनच ते सहस्रो वर्षे टिकले आहे. काही थोड्या लोकांनी ज्योतिषशास्त्राला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिषशास्त्र थोतांड ठरत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे.
४. आम्ही मागणी करत आहोत की, शासनाने घेतलेला स्तुत्य निर्णय कुणाच्याही अभ्यासहीन दबावाला बळी पडून पालटू नये आणि ज्योतिषशास्त्र हा विषय विद्यापिठात चालू करावा.
निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. व्यंकटेश शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राहुल मराठे, जितेंद्र मराठे, आकाश गावित, भूषण कलाल आदी उपस्थित होते.