गेले दीड वर्ष कोरोनामुळे ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध कारागृहांतील बर्याच गुन्हेगारांना जामिनावर सोडून देण्यात आले. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. उदरनिर्वाहाचे साधनच नसल्याने जामिनावर सुटलेले गुन्हेगार आणि २० ते ३० वर्षे वयोगटांतील तरुण यांनी गुन्हे करण्यास प्रारंभ केल्याचे पोलीस अन्वेषणातून समोर आले आहे. ‘कोविड’मध्ये बंदोबस्त आणि इतर कामे दिली गेल्याने पोलिसांना गुन्हेगारांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळाला नाही’, असे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ‘गुन्हेगारांचे फावले’, असेच म्हणावे लागेल.
मराठवाड्यातील संभाजीनगर, धाराशिव, परभणी, जालना, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांत खून, दरोडा, मंगळसूत्र चोरी, तसेच वाहनचोरी यांसारख्या असंख्य घटना घडत आहेत. गेल्या काही मासांत शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकारही वाढले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील शेलगाव येथे बिअर बारमधील ६७ सहस्र रुपये, तसेच माळीवाडा भागात बंदुकीचा धाक दाखवून सव्वा लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. या दोन्ही घटनांत ३० ते ३५ वर्षे वयोगटातील २ युवकांचा सहभाग होता. वरील ७ जिल्ह्यांत अशा घटना प्रतिदिन घडत असल्याचे समोर येत आहे.
वरील उदाहरणांतून गुन्हा केलेल्या व्यक्तीला शिक्षेसाठी कारागृहात ठेवल्यानंतर ती व्यक्ती शिक्षा भोगते; परंतु तिच्या वृत्तीमध्ये काहीच पालट होत नाही, हेच सिद्ध होत आहे. गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करू नये, यासाठी त्याच्या वृत्तीमध्ये पालट व्हावा, असे प्रयत्न कारागृहात केले जात नाहीत, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे काही गुन्हेगार कारागृहातून बाहेर आल्यावर अट्टल गुन्हेगारही होतात, तर काही जण संपूर्ण निराशेत जातात. गुन्हेगारांना कारागृहामध्ये शिक्षेसमवेत त्यांच्यामध्ये पालट होण्यासाठी प्रयत्न केल्यास गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकेल. मुळात व्यक्ती वाईट नसते, तर तिच्यावर झालेले कुसंस्कार आणि स्वभावदोष तिला वाईट कृत्ये करायला भाग पाडतात. संस्कारांमध्ये पालट होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर साहाय्य व्हायला हवे. मानसिक समुपदेशनासह धर्मशिक्षण देऊन साधना करवून घेतल्यास गुन्हेगारांमध्ये पालट होण्याची गती वाढेल. हिंदु राष्ट्रात बंदीवानांकडून साधना करून घेतली जाईल.
– श्री. सचिन कौलकर, मिरज.