२० ऑगस्ट या दिवशी पडळकरवाडी (जिल्हा सांगली) येथे आंदोलन
सांगली – बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागाची संस्कृती आहे. या शर्यतीमुळे शेतकरी बैलांचे पालनपोषण करतो, त्यांना सकस आहार देतो, त्यांचा जीवापाड सांभाळ करतो. या बैलांमुळे खर्या अर्थाने गोवंश वाढतो; मात्र बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यामुळे राज्यातील ८७ लाख बैलांची संख्या मागील दीड – दोन वर्षांत ५७ लाख इतकी झाली आहे. ३० लाख बैल पशूवधगृहांत पाठवण्यात आले. जर हे असेच चालू राहिले, तर १-२ वर्षांत आपल्याला बैल चित्रातच बघावा लागेल. गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली जात आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. ‘ऑफ बीट पडळकर’ या ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गोपीचंद पडळकर बोलत होते. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी ही मुलाखत घेतली.
या वेळी गोपीचंद पडळकर म्हणाले…
१. सर्वोच्च न्यायालयात सरकारने योग्य बाजू मांडली पाहिजे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. यापूर्वी एक ते दीड लाख इतकी बैलाची किंमत होती. आता ३० सहस्रही मिळत नाहीत. त्यामुळे ‘बैल संपवावे’, अशी काहींची धारणा होते; कारण त्यांना ट्रॅक्टर विकायचे आहेत. यामागे ट्रॅक्टर लॉबीही विशेष कार्यरत आहे.
२. आपली मुले सुदृढ झाली पाहिजेत. त्यांना सकस आहार मिळाला पाहिजे, यासाठी गोवंश जगाला पाहिजे; म्हणून आम्ही बैलगाडा शर्यतीसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत.
३. बैलगाडा शर्यत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकार योग्य बाजू मांडत नाही. या विषयावर ३-३ वर्षे तारखाही पडत नाहीत. याचे दायित्व राज्य सरकारचे आहे. त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे.
४. तमिळनाडू आणि कर्नाटक येथे या शर्यतींना अनुमती आहे. त्या राज्यांनी त्याविषयी कायदा बनवून तो टिकवलाही आहे.
५. २० ऑगस्ट या दिवशी यानिमित्त माझ्या गावात (सांगलीमधील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी या गावात) आंदोलन होणार आहे, त्यासाठी अधिकाधिक शेतकर्यांनी बैल घेऊन यावे.