अमरावती येथील न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना ३ मासांच्या कारावासासह ४५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला !

तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण

देवेंद्र भुयार

अमरावती – वरूड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिवीगाळ करत, मारण्याची धमकी देऊन आणि ‘माईक’ फेकून मारत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वरूड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना १६ ऑगस्ट या दिवशी ३ मासांच्या कारावासासह ४५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १ मासाच्या साध्या कारावासाच्या शिक्षेचा समावेशही करण्यात आला आहे. येथील जिल्हा न्यायाधीश एस्.एस्. अडकर यांनी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने साहाय्यक सरकारी अधिवक्ता सुनीत घोडेस्वार यांनी युक्तीवाद केला.

१. ‘२७ फेब्रुवारी २०१३ या दिवशी ‘सुवर्ण जयंती राजस्व अभियाना’च्या यशोगाथेचे काम चालू होते. वरूड तहसीलदार कार्यालयात मी काम करत होतो, त्या वेळी देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले आणि जोरजोरात बोलू लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र विलंबापर्यंत बंद का आहे ? तुम्ही माझा दूरभाष का कट केला ?, असे प्रश्न त्यांनी मला विचारले होते. मला त्यांनी अर्वाच्च भाषेत आईवरून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आणि ‘माईक’ फेकून मारला होता’, अशा आशयाची तक्रार तत्कालीन तहसीलदार राम लंके यांनी वरूड पोलीस ठाण्यात दिली होती.

२. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी देवेंद्र भुयार यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३, १८६, २९४ आणि ५०६ या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता. अन्वेषणाअंती १५ एप्रिल २०१३ या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते.

३. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ५ साक्षीदार पडताळण्यात आले होते. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी केले. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर १० सहस्र रुपये हानीभरपाई म्हणून तक्रारदार राम लंके यांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार ! – देवेंद्र भुयार, आमदार

‘‘वर्ष २०१३ मध्ये झालेल्या एका प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल मला मान्य आहे. या निकालाच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष चालूच रहाणार आहे.’’